ठाणे : जिल्ह्यातील १८ पैकी केवळ २ महिला आमदार या विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. एकीकडे मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी पुरुष आमदारांची रस्सीखेच सुरू आहे. परंतु, ५० टक्के आरक्षण दिले असतांनाही मंत्रिमंडळात मात्र स्थान मिळत नसल्याने महिलांमध्येही नाराजी आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील आमदार महिलांना आता मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. पैकी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ दोनच महिला निवडून आल्या आहेत. शिवसेनेने नऊ तिकिटांपैकी फक्त दीपाली सय्यद यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेस, राष्ट्रवादीने दोन महिला उभ्या केल्या होत्या. जवळजवळ सगळ्याच पक्षांनी महिलांना उमेदवारी देताना हात आखडला होता. भाजपने बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांनी उमेदवारी दिली होती. मात्र, याच पक्षाने मीरा-भार्इंदर येथे गीता जैन या दमदार उमेदवार असतानाही त्यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे त्या अपक्ष लढूनही निवडून आल्या. आता त्या भाजपमध्ये गेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात १८ पैकी फक्त दोनच महिला आमदार झाल्या आहेत. अशा वेळी या महिलांना मंत्रिमंडळात तरी वाटा मिळायला हवा. परंतु, येथेही त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचे दिसत आहे. कारण जिल्ह्याला मिळणाऱ्या संभाव्य चारही मंत्रिपदात एकाही महिलेचे नाव घेतले गेलेले दिसत नाही. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे संजय केळकर, किसन कथोरे आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड (विरोधीपक्ष नेते) हे चार पुरु ष चेहरे चर्चेत आहेत. त्यामुळे महिला आमदार मंत्रिपदाच्या वाटपातही वंचित राहणार असल्याचे दिसत आहे.२९ लाख महिला मतदारांमध्ये नाराजीवास्तविक पाहता १८ आमदारांच्या ठाणे जिल्ह्यात सगळ्याच पक्षांनी किमान ६-७ महिलांना उमेदवारी देणे अपेक्षित होते. परंतु, तेवढे सौजन्यही कोणी दाखिवले नाही. परिणामी जिल्ह्यातील २९ लाख १२ हजार ३८२ महिला मतदारांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळते आहे. तसेच ज्या दोन महिला पुरु षी व्यवस्था धुडकावून निवडून आल्यात, त्यांनाही मानाचे स्थान नसल्याची खंत महिला मतदारांमध्ये आहे.
गीता जैन यांनी मीरा-भाईंदर मधून नरेंद्र मेहता भाजपच्या या बड्या असामीला पराभूत केले आहे. तर बेलापूर मतदारसंघातून विजयी झालेल्या मंदा म्हात्रे यांनी २०१४ मध्ये गणेश नाईक यांना पराजित करून त्यांच्या साम्राज्याला धक्का दिला होता. त्यामुळे या दोघ्या वाघीणींचा मंत्रिपदासाठी प्राधान्याने विचार होणे गरजेचे असताना शिवसेना आणि भाजपकडून पुरुष आमदारांचाच मंत्रीपदासाठी विचार केला जात असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पण त्यांच्या संख्येच्या प्रमाणात कोणत्याच पक्षाने महिलांना निवडणुकीत उमेदवारी देताना मोठे मन दाखिवले नाही. त्यामुळे आता तरी एका तरी महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी, मागणी महिला पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.