ठाणे : माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर परप्रांतीय फेरीवाल्याने हल्ला केल्यानंतर फेरीवाल्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत स्टेशन ते जांभळी नाका भागात मागील ३० ते ३५ वर्षे टोपली घेऊन व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई होत असल्याने अखेर शनिवारी संतप्त झालेल्या महिलांनी महापालिका उपायुक्तांना घेराव घातला. एका फेरीवाल्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा वर्षानुवर्षे फेरीचा व्यवसाय करणाऱ्या आम्हाला का देता, असा सवाल केला.
मागील काही दिवसांपासून शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. गेली ३० ते ३५ वर्षे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई होत असल्याने शनिवारी त्यांच्या भावना तीव्र झाल्या. कारवाईकरिता आलेल्या अधिकाऱ्यांकडे त्यांनी ही भावना व्यक्त केली. शनिवारी नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत स्टेशन ते जांभळी नाका परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होती. जांभळी नाका भागात टोपलीत भाजी घेऊन विकणाऱ्यांचे साहित्य आणि टोपल्या पथकाने जप्त केल्या. या कारवाईच्या विरोधात महिला फेरीवाल्यांनी आवाज उठवला. गेली ३५ वर्षे ठाण्यात व्यवसाय करतोय. अनेक अधिकारी पाहिले. एका फेरीवाल्याने चूक केली; पण त्याची शिक्षा आम्हा सर्वांना का, असा सवाल या महिलांनी केला. जांभळी नाका परिसरात ठाणे, पालघर जिल्ह्यातील कातकरी महिला रानभाज्या, इतर भाज्या व साहित्य घेऊन विकण्यास येतात. वरचेवर कारवाई होत असल्याने त्या नाराज झाल्या आहेत.
..............
महिलांच्या टोपल्या जप्त केल्याने त्या आल्या होत्या. त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. मात्र कारवाई होतच राहणार असल्याने त्या महिलांना येथे बसून व्यवसाय करू नका, अशा सूचना दिल्या आहेत.
- शंकर पाटोळे, उपायुक्त, ठामपा
............
वाचली.