भातसानगर : महिला केवळ आजही चूल आणि मूल, यामध्येच अडकून पडल्या आहेत. परंतु, महिलांनी पुढे येऊन आपला आर्थिक विकास साधला पाहिजे. त्यासाठी त्यांनी शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे, असे आवाहन ठाण्यातील जिल्हा ग्रामविकास प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे यांनी धसई येथे केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वप्नपूर्ती लोक संचालित साधन केंद्र धसई, अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पामधून समुदाय संचालित प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सिसोदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी कोकण विभागाचे विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी मंगेश सूर्यवंशी यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामाची माहिती दिली. या प्रसंगी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते यांनी केले. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक सारिका, अमित सय्यद, बाबासाहेब सावंत, लोंढे आदी उपस्थित होते.
----------