लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पूर्वेतील नांदिवली टेकडी परिसरात महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याविना हाल होत असल्याने त्रस्त झालेल्या परिसरातील महिलांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून केडीएमसी आणि एमआयडीसीचा निषेध केला. यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास केडीएमसीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महिलांनी यावेळी दिला.
या संदर्भात रहिवासी सुप्रिया कुलकर्णी यांनी सांगितले की, महिनाभरापासून पाणी समस्या भेडसावत आहे. त्याबाबत आयुक्त विजय सूर्यवंशी यांना देखील माहिती दिली, पण समस्या सुटलेली नाही. बहुतांशी सोसायट्या पाणी येत नसल्याने टँकर मागवत आहेत. त्यातही नांदिवली टेकडी परिसरातील शांताराम दर्शन, श्री संकल्प, अंबर तीर्थ सोसायटी, यशश्री अपार्टमेंट, महाकाली आर्केड या इमारतींना जास्त पाणीटंचाई भेडसावत आहे. महिना झाला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे, पण तो पुरत नाही. त्यामुळे नागरिक हैराण आहेत. अखेर त्रस्त महिलांनी पाणी मिळायलाच हवे, यासाठी एकत्र येत आवाज उठवला.
पाणी समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींचे प्रयत्नही कमी पडत आहेत. त्यामुळे महिलांना रस्त्यावर उतरावे लागले. पाणी समस्या न सुटल्यास आगामी काळात जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी परिसरातील नागरिकांनी दिला.
----------------------