उल्हासनगर: निवडणूक आचारसंहितेमुळे ३ हजार १९८ शिलाईमशीन व घरघंटी यंत्र देण्यावर महापालिकेला मर्यादा आली. मात्र पात्र महिलांना फोन करून यंत्रासाठी बोलाविते कोण? असा प्रश्न महिलांना पडला असून महापालिका शाळा क्रं-२९ मधील रूममध्ये शिलाईमशीन व घरघंटी ठेवल्या कोणी? असा प्रश्न निर्माण झाला.
उल्हासनगर महापालिकेने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याणकारी योजने अंतर्गत शासन योजने अंतर्गत ३ हजार २९८ शिलाईमशीन व घरघंटीसाठी महिलांकडून अर्ज मागविले होते. अर्जाची छाननी करून पात्रता यादीतील महिलांची लॉटरी काढून पात्र महिलांची यादी प्रसिद्ध केल्याची माहिती महापालिका महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख रितेश रंगारी यांनी दिली. निवडणूक आचारसंहितापूर्वी दोन दिवस आदी १३ मार्च रोजी यंत्र वाटपाचा प्रातिनिधिक स्वरूपाचा कार्यक्रम प्रांत कार्यालय प्रांगणात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाला. दरम्यान आचारसंहिता लागू झाल्याने, शिलाई मशीन व घरघंटी वाटण्यावर मर्यादा येऊन यंत्र वाटपाचा कार्यक्रम निवडणुकीनंतर होणार असल्याची माहिती उपायुक्त सुभाष जाधव यांनी दिली आहे.
महापालिका महिला व बालकल्याण विभागाने निवडणूक आचारसंहितामुळे शिलाई मशीन व घरघंटीचे वाटप निवडणुकीनंतर होणार सांगितले. प्रत्यक्षात पात्र यादीतील पात्र महिलांच्या मोबाईलवर फोन करून शिलाई मशीन घेण्यासाठी बोलाविण्यात येत आहे. तसेच सोबत आधारकार्ड, शिधावाटप पत्रिका, पॅनकार्ड, रहिवासी दाखल, निवडणूक कार्ड पुरावा म्हणून घेऊन आणण्यास सांगण्यात येते. कॅम्प नं-४ येथील वर्षा सावंत, संगीता कदम, आसमा खान, ललिता घोडगे यांच्यासह अन्य महिलांना असे फोन गेले. त्यांनी महापालिका गाठल्यावर, असे फोन महापालिकेतून केले नसल्याचे महिला व बालकल्याण विभागातून सांगण्यात आले. अश्या असंख्य महिला यंत्र मिळणार म्हणून महापालिकेच्या पायऱ्या झिजवीत आहेत. उपायुक्त सुभाष जाधव यांनी निवडणुकीनंतर डीबीटी प्रणालीद्वारे शिलाईमशीन व घरघंटी देण्यात येण्याचे परिपत्रक काढा. असे राहिला व बालकल्याण विभागाला सांगावे लागले आहे.
महापालिका शाळेत यंत्राचा साठा कसा? महिलांना डीबीटी प्रणालीद्वारे शिलाईमशीन व घरघंटी देणार असल्याचे सांगण्यात येत असतांना, महापालिका शाळा क्रं-२९ मधील रूममध्ये शिलाईमशीन व घरघंटीचा साठा ठेवला कोणी? असा प्रश्न पडला आहे.
निकृष्ठ यंत्राचा आरोपघरघंटीची किंमत २१ हजार ५०० तर शिलाईमशीनची किंमत १३ हजार आहे. प्रत्यक्षात दोन्ही यंत्राची किंमत बाजारभावयानुसार अर्धीही किंमत नसल्याचे बोलले जाते.