ठाणे - एकीकडे ठाणे शहर स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत आहे. तसेच हगणदारीमुक्तीसाठी महापालिका विविध योजना हाती घेत आहे. परंतु महापालिका मुख्यालयात महासभेच्या सभागृहाबाहेर असलेले महिलांसाठीच्या शौचालयाची दैना झाल्याची बाब मंगळवारी झालेल्या महासभेत उघड झाली. केवळ मुख्यालयातीलच नाही तर, शहराच्या झोपडपट्टी भागातील महिला शौचालयांची अवस्था देखील दयनीय असल्याचा गौप्यस्फोट करीत सर्वपक्षीय नगरसेविका महासभेत आक्रमक झाल्या होत्या. त्यानुसार मुख्यालयातील शौचालय दुरुस्त होत नसेल तर पुढील महासभेवर बहिष्कार टाकू असा इशारा नगरसेविकांनी दिला. पिठासीन अधिकारी तथा प्रभारी महापौर रमाकांत मढवी यांनी मुख्यालयातील शौचालयाची दुरुस्ती झाली नाही तर पुढील महासभा होणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.मंगळवारी झालेल्या महासभेत, महापालिका क्षेत्रात बांधण्यात येणाऱ्या वैयक्तीक शौचालयांची व सार्वजनिक शौचालयांची जोडणी मलनिसारण व्यवस्थेत करण्याकरीता मलवाहीनी टाकणे बाबतचा प्रशासकीय व वित्तीय मान्यतेचा प्रस्ताव पटलावर मंजुरीसाठी आला होता. या अनुषंगाने शिवसेनेच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी आपण स्मार्ट सिटीचा गवगवा करीत आहोत, हगणदारीमुक्तीसाठी विविध पावले उचलत आहोत. परंतु मुख्यालयातील महिला शौचालयाची अवस्था अतिशय दयनीय असल्याची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. महिन्यातून एकदा महासभेसाठी आम्ही येथे दिवसभर सभागृहात बसून असतो. परंतु येथील शौचालयाची अवस्था अतिशय वाईट असल्याचे त्यांनी सांगितले. तर मीनल संख्ये यांनी देखील त्यांच्या प्रभागातील महिला शौचालयांची अवस्थेचा पाढा वाचला. एका मागून एक नगरसेविकांनी अशा पध्दतीने महिला शौचालयांचा पाढा वाचत जो पर्यंत मुख्यालयातील शौचालयाची अवस्था सुधारत नाही तो पर्यंत महासभेवर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा देत, सर्व पक्षीय नगरेसेविका एकवटल्या आणि त्यांनी उभे राहून प्रशासनावर हल्लाबोल केला. तर, पिठीसीन अधिकारी तथा प्रभारी महापौर रमाकांत मढवी यांनी महिला नगरसेविकांचे म्हणने रास्त असल्याचे सांगत पुढील महासभेपर्यंत शौचालयाची दुरुस्ती झाली नाही तर महासभा होणार नसल्याचा इशारा दिला. त्यानुसार प्रशासनाने देखील शौचालयाच्या दुरुस्तीचे आश्वासन दिले.
- दिव्यातील शौचालयाचा पाढा वाचतांना राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी येथील शौचालयांना दरवाजेच नसल्याचे सांगितले. त्यामुळे एखाद्याला शौचालयात थांबायचे असेल तर त्याला गाणे म्हणन्याशिवाय पर्यायच नसल्याचे सांगितले.