प्रज्ञा म्हात्रेठाणे : देहदानाविषयी असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आणि समाजात देहदानाची जागृती करण्यासाठी २४ वर्षांच्या तरुणीनेच मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प सोडला आहे. वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण घेणाऱ्या चंदनवाडी येथील दिव्या पाटील हिने हा संकल्प करून आजच्या तरुणाईसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे.
मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना कॉलेजकडून देहदानाचा अर्ज देण्यात आला असता दिव्याने तो तत्काळ भरला. मरणानंतर आपल्या शरीराचा एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यासासाठी उपयोग होऊ शकतो किंवा एखादे अवयव आपले दान झाल्यास, त्या गरजू मनुष्याला पुनरुजीवन मिळू शकते, हा विचार मनात घेऊन दिव्याने स्वेच्छेने मरणोत्तर देहदानाची इच्छा दर्शवली. देहदान किंवा अवयवदानासाठी लोक पुढे येत नाहीत. देहदान हे जिवंतपणी करतात, तर आपले मृत शरीर जाळले नाही तर आत्म्याला शांती मिळत नाही, अशा अनेकांमध्ये अंधश्रद्धा असल्याने, तसेच देहदान, अवयवदानाविषयी जागृती नसल्याने अनेक जण यासाठी पुढे सरसावत नाहीत, त्यामुळे याची सुुरुवात आपल्यापासूनच करावी म्हणून दिव्याने हा संकल्प केला. दिव्याचे वडील आणि लहान भाऊ दोघेही डॉक्टर आहेत. दिव्या गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्याची आवड जोपासत असल्याने तिच्यावर समाजसेवेचा पगडा आहे. तिने केवळ संकल्पच केला नाही, तर आपली मित्रमंडळी आणि परिचितांनाही मरणोत्तर देहदानासाठी प्रोत्साहन देत आहे. काही मुलींना मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा आहे; पण केवळ त्यांच्या पालकांमुळे त्यांना करता येत नसल्याचा अनुभवही तिने सांगितला. त्यामुळे देहदान हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे, त्यासाठी कोणाच्या परवानगीची गरजही नाही, असे तिने सांगितले.स्वामी फाउंडेशनचे संस्थापक महेश कदम यांच्या वतीने महिला दिनानिमित्त दिव्या हिचा तिच्या या कार्याबद्दल रविवारी सत्कार होत आहे. या सत्कारामुळे माझ्या मरणोत्तर देहदानाविषयी अनेकांना समजल्याने आता तरुणवर्ग मरणोत्तर देहदानाची इच्छा बाळगत असून, माझ्याकडे नोंदणीसंदर्भात विचारपूस करत असल्याचे तिने सांगितले.