ठाणे : प्रारंभ कला अॅकॅडमी, ठाणेच्यावतीने रविवार ९ डिसेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी ९.४५ ते दुपारी २ यावेळेत महिला महोत्सवाचे आयोजन केले आहे. हे या महोत्सवाचे सहावे वर्षे असून दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. एकपात्री, पोवाडा, वक्तृत्व, कडधान्य ओळखणे, संगीत खुर्ची आणि पाककला या सहा स्पर्धा ठाणे, चेंबुर, अंबरनाथ, भिवंडी अशा विविध ठिकाणी जाऊन घेण्यात आल्या. तसेच, ठाण्यातील विविध शाळा ही या स्पर्धांत सहभागी होत्या.सामान्य महिलेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या या उपक्रमाला सर्व महिलांनी सहभागी होऊन भरभरु प्रतिसाद दिला. जवळपास ६०० च्या आसपास महिला सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा. विविध मंगळागौरीचे खेळ, सोलापूरच्या अपर्णा रामतीर्थकर यांचे ‘नाती कशी जपावी’ यावरील व्याख्यान आणि अभिनेते भारत गणेशपुरे यांची डॉ. अरुंधती भालेराव घेणार असलेली मुलाखत असे स्वरुप या महोत्सवाचे आहे. प्रारंभ आणि ठाणे परिसरातील आदीवासी पाडे, गरिब वस्ती अशा ठिकाणी असणाºया मुलांसाठी मोफत वाचनालय सुरू करत आहेत. या मोबाईल व्हॅनमध्ये शिक्षक, जे मुलांपर्यंत पोहोचून त्यांना वाचनाची गोडी लावतील, गोष्टी सांगतील, खेळ घेतील. या व्हॅनमध्ये दोन स्क्रीन्स आहेत. ज्या मार्फत पाड्यांमध्ये जिथपर्यंत नाटकं पोहोचत नाहीत, तेथील मुलांना प्रारंभची बालनाट्य स्क्रीनवर पाहता येतील. आदीवासी पाड्यांतील महिलांसाठी स्त्रीरोग विषयक आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन केले जाते. या व्हॅनमध्ये अशा प्रकारच्या तपासणीसाठीची सुद्धा सोय करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्यावसायीक समीर नातू, राजेश गाडगीळ, पितांबरीचे व्यस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाईल, भूमी वर्ल्डचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रकाश पटेल, अभिनेत्री हर्षदा खानविलकर, सुप्रिया पाठारे आणि राणी गुणाजी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.