भिवंडी : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कांबे ग्रामपंचायतीस स्टेम प्रशासनाकडून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामपंचायतीकडून गावातील वस्तीत आठवड्यातून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून संताप व्यक्त केला. यावेळी निजामपुरा पाेलिसांचा बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.
कांबे गावाची लोकसंख्या सुमारे दहा हजार आहे. स्टेमकडून प्रतिदिन एक लाख लीटर पाणी गावासाठी उपलब्ध होते. या पाइपलाइनवर अनेक बेकायदा नळजोडणी असल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. त्याचा परिणाम गावातील पाणीपुरवठ्यावर होताे. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी स्थापन झालेल्या पाणीहक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश तेलिवरे, माजी पंचायत समिती सभापती श्रीधर खारीक, अजिंक्य गायकवाड, सुभाष रापेर, आकाश गायकवाड, अंकुश मिरका, विजय भगत, समीर रापेर या शिष्टमंडळाने सरपंच सुखदेव पागी, ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद वानखेडे यांच्याकडे निवेदन देऊन ग्रामस्थांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आठवड्यातून एकदा पाणी येत असून नागरिकांना टॅंकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे, अशी खंत ज्योती प्रदीप भोई यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीने स्टेमकडे आपल्या वाट्याचे प्रतिदिन दिले जाणारे पाणी उचलण्याची व्यवस्था करावी. २०१६ पासून प्रलंबित असलेली कोट्यवधी रुपयांची नळपाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करावी, अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अजिंक्य गायकवाड यांनी दिला आहे. ग्रामपंचायतीकडे थकबाकी नसतानाही कमी पाणी मिळत असल्यामुळे स्टेम प्रशासन जबाबदार आहे. याप्रश्नी उपविभागीय कार्यालयावर माेर्चा काढल्यास आपण ग्रामस्थांसाेबत असू, असे सरपंच सुखदेव पागी यांनी सांगितले.