नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसईतील शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार पराकोटीला पोहोचला असून नागरिकांच्या विविध कामांकरता यापूर्वी टेबलाखालून पैशाची मागणी होत असे मात्र ,आता भ्रष्ट कर्मचारी नागरिकांच्या कामाची पूर्तता करण्यासाठी आलेल्या महिलेची अब्रू मागत असल्याची घृणास्पद घटना वासळई तलाठी कार्यालयात घडली होती. शासकीय यंत्रणा आरोपीला वाचवत असल्याची भावना निर्माण झाल्याने या निंदनीय प्रकारा विरोधात वसईकरांच्या मनातली तीव्र खदखद बुधवारी मोर्चाच्या स्वरूपातून बाहेर पडली.
वासळई तलाठी कार्यालयात एका शिक्षक महिलेला फेरफार संदर्भातील काम पूर्ण करून घेण्यासाठी, येथील तलाठी विलास करे याने अश्लील कृत्य केले होते. आरोपीच्या विरोधात संबंधित महिलेची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया ते आरोपीला बोलवून अटक न करता सोडून देण्याचा प्रकार वसई पोलिसांनी केला होता. तसेच न्यायालयात हजर केल्यावर आरोपीस पोलीस कोठडीची मागणी न करता त्याला जामीन होण्यापर्यंतच्या कार्यपद्धतीत पोलिसांनी बजावलेली भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच विरोधात बुधवारी वसई तहसीलदार व वसई पोलीस ठाणे दोन्ही ठिकाणी 'श्रृंगार त्याग' व त्याचे 'अर्पण' असे मोर्चाचे आयोजन केले होते.
यावेळी आंदोलनकर्त्यानी वसईतील महिला असुरक्षित असल्याचा प्रतिकात्मक संदेश देण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना तहसीलदारांमार्फत टिकल्या, बांगड्या, सौंदर्याचे सामान, खण इत्यादी सुपुर्त करण्यात आले. वसई पोलीस अधिकाऱ्यांना हीच प्रतिकात्मक भेट आंदोलनकर्त्यांनी दिली. यावेळी निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त करून आरोपी तलाठ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले असून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी, पालघर यांना सादर करण्यात आल्याची माहिती दिली. यापूर्वी सदर तलाठ्यास लांच लुचपत विभागाने पैसे घेताना अटक केली होती. त्यामुळे त्यास पदमुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलन कर्त्यांना प्रतिसाद देताना सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी याबाबत आरोपीचा जामीन रद्द होण्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात येणार असल्याची तसेच पिडित महिला अजूनही यातुन सावरलेली नसून, तिला यातुन बाहेर काढण्यासाठी व्यक्तीश: आपण संपर्कात आहोत अशी माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी डॉमणिका डाबरे, किरण चेंदवणकर, वेरोणिका रिबेलो, स्मिता जाधव, साधना डीक्रूझ, वेरोणिका डाबरे यांच्यासह मोठा महिला वर्ग विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व सर्वसामान्य वसईकर सामील झाले होते.