ठाणे : कळवा परिसरात पायी जाणाऱ्या महिलांच्या हातातील मोबाइलची जबरीने चोरी करणाऱ्या मोहम्मद हसन असगर अली शेख (२३, रा. कळवा, ठाणे) याला कळवा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील ३३ हजारांचे तीन मोबाइल जप्त केले आहेत.
कळवा पूर्वेतील इंदिरानगर येथील रहिवासी रूपाली शिंदे (३३) या २६ फेब्रुवारीला रात्री कळवा पूर्व रेल्वेस्थानक येथून घरी जाण्यासाठी मफतलाल तलावासमोरील रस्त्यावरून पायी जात होत्या. त्यावेळी एका भामट्याने त्यांची मान पकडून त्यांच्या हातातील सात हजारांच्या मोबाइल फोनची चोरी केली. याप्रकरणी २८ फेब्रुवारीला त्यांनी कळवा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, हवालदार शहाजी एडके, माधव दराडे, रमेश पाटील, पोलीस नाईक संदीप महाडिक, रवींद्र बिऱ्हाडे, संतोष ठेबे आणि विकास साठे आदींच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कळवा स्थानक परिसरात सापळा रचून १ मार्चला शेख याला अटक केली.
सखोल चौकशीत संचिता कदम (२५, रा. खारेगाव) यांचा १८ हजारांचा मोबाइल २७ फेब्रुवारीला चोरल्याची तसेच मालती सोरटे (१८, रा. इंदिरानगर) यांचाही आठ हजारांचा मोबाइल शेख याने २५ फेब्रुवारीला चोरल्याची कबुली दिली.
पोलीस कोठडीत रवानगी
शेख याच्याकडून हे तिन्ही मोबाइल जप्त केले आहेत. त्याला ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
------------