राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून नंदिनी थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर सोमवारी हंडा मोर्चा काढण्यात आला. कविता पाटील, जान्हवी शेरेकर, रूपाली सावंत, प्रियांका खंडागळे, खंदारे, गाडे व परिसरातील महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या. दीड महिन्यापासून बदलापूर पूर्वेकडील स्टेशनपाडा, संकल्प सिद्धी सोसायटी, आगर आळी, गांधी चौक, आदी भागात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागात अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, पाणी सोडण्याच्या वेळाही निश्चित नाहीत. त्यामुळे नागरिकांची विशेषतः महिला वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच आता गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महिलांनी हंडा मोर्चा काढून पाणी टंचाईचा निषेध केला असल्याची माहिती नंदिनी थोरात यांनी दिली. तातडीने पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
...
...तर ठिय्या आंदोलन!
गणेशोत्सवापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रूपेश थोरात यांनी दिला आहे.