- नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी शहर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कांबे ग्रामपंचायतीस स्टेम प्रसाशना कडून अपुरा व अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामपंचायती कडून गावातील वस्तीत आठवड्यातून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने संतप्त महिलांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला आहे . (Women's pot morcha for water at Kambe Gram Panchayat in Bhiwandi)
कांबे गावाची लोकसंख्या सुमारे दहा हजार असून स्टेम कडून प्रतिदिन एक लाख लिटर पाणी गावासाठी उपलब्ध होते परंतु या पाईपलाईन वर अनेक अनधिकृत नळ जोडण्या असल्याने पाणी पुरवठा कमी होत असल्याने त्याचा परिणाम गावातील पाणी पुरावठ्या वर होत असून त्यामुळे नागरीक संतप्त आहेत . या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी स्थापन झालेल्या पाणी हक्क संघर्ष समिती च्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .ज्यामध्ये अनेक महिलांसह पुरुष मंडळी सहभागी झाले होते .जिल्हा परिषद सदस्य प्रकाश तेलीवरे, माजी पंचायत समिती सभापती श्रीधर खारीक ,अजिंक्य गायकवाड ,सुभाष रापेर,आकाश गायकवाड ,अंकुश मिरका,विजय भगत, समीर रापेर या शिष्टमंडळाने सरपंच सुखदेव पागी, ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद वानखेडे यांच्या कडे निवेदन देऊन ग्रामस्थांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
पाणी हे जीवन असताना गावातील महिलांना आठवड्याने एकदा पाणी पुरवठा होत असल्याने त्याची साठवण क्षमता प्रत्येक जवळ नसल्याने येथील नागरीकांना पैसे खर्च करून टँकर द्वारा पाणी विकत घ्यावे लागत असून आठवड्या भराचे शिळे पाणी वापरल्याने गावात आजारी होण्याचे प्रमाण वाढले असल्याची खंत ज्योती प्रदीप भोई यांनी बोलून दाखविली .ग्रामपंचायतीने स्टेम कडे आपल्या वाट्याचे प्रतिदिन दिले जाणार सर्व पाणी उचलण्याची व्यवस्था करावी ,2016 पासून प्रलंबित असलेली कोट्यवधी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अजिंक्य गायकवाड यांनी दिला आहे .ग्रामस्थांच्या भावना आपण समजू शकतो परंतु यास सर्वस्वी स्टेम प्रशासन जबाबदार असून ग्रामपंचायतीचे पाणी बिल थकबाकी नसतानाही गावाला कमी पाणी पुरवठा होत असल्याने यापुढे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला तर त्यामध्ये आपण ही ग्रामस्थां सोबत असू अशी माहिती सरपंच सुखदेव पागी यांनी दिली .या प्रसंगी निजमपुरा पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त ठेवला होता .