आसनगाव : मौजे मानेखिंड येथे सामाजिक सभागृह बांधण्याचे काम वर्दळीच्या रस्त्यावर सुरू असून सभा मंडपावरून विजेच्या तारा गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवास धोका असून, सभागृहामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार असल्याने ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता यांच्याकडे काम बंद करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
शहापूर तालुक्यातील मौजे मानेखिंड येथे सामाजिक सभागृह नसल्याने ग्रामस्थांना लग्न व इतर सामाजिक कार्यासाठी गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांची मागणी लक्षात घेत ग्रामविकास योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २ नोव्हेंबरला कार्यारंभ आदेश काढण्यात आला.
या कामासाठी आठ लाख ७९ हजार ८०३ रु पये खर्च येणार आहे. हे कंत्राट ठेकेदार अक्षय भोईर यांना देण्यात आले आहे. मानेखिंड गावात सुरू असलेले सभागृहाचे काम जिल्हा परिषदेची परवानगी न घेता रस्त्यावर सुरू आहे. हे सभागृह गावातील प्रमुख रस्त्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा होईल तसेच काम सुरू असलेल्या सभागृहावरून विजेच्या तारा गेल्या आहेत. यामुळे भविष्यात ग्रामस्थांच्या जीवितास धोका होऊ शकतो. यामुळेच मानेखिंड ग्रामस्थांचा रस्त्यावर सामाजिक सभागृहाच्या बांधकामाला विरोध आहे. याबाबत उपविभागीय अभियंता कार्यालयास वारंवार निदर्शनास आणून देऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता अ. नि. जाधव यांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली आहे.सभागृहाला आमचा विरोध नाही; परंतु ते गावातील रहदारीच्या रस्त्यावर नसावे. - शिवाजी सपाट, माजी उपसरपंचया कामाबाबत ग्रामस्थांच्या तक्र ारी आल्या असता, उपअभियंता यांच्यासह पाहणी करून काम थांबवण्यास सांगितले आहे. - बी. आर. कांबळे, शाखा अभियंता