कल्याण : कल्याण-डोंबिवलीत झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचले होते. शनिवारपासून पावसाने विश्रंती घेतल्याने पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. पाण्यामुळे साचलेला कचरा काढण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कचरा काढण्याचे आदेश देत हे काम युद्धपातळीवर करण्यात यावे, असे अधिकाऱ्यांना सांगितले होते. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी जंतुनाशक आणि धूर फवारणी करण्यात येत आहे. ई प्रभागातील नांदिवली नाल्यातून वाहून आलेला गाळ उचलण्याची कार्यवाही सुरू आहे. पाणी साचलेल्या परिसरातील नागरिकांना अतिसार, कॉलरा, काविळ या जलजन्य आजारांची लागण होऊ नये. तसेच हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस या आजारांची लागण होऊ नये यासाठी पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत सर्वेक्षण करण्यात यावे. त्याचबरोबर नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत महापालिकेने १५ हजार ४७९ जणांना डॉक्सी टॅबलेटचे वाटप केले आहे.