कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक विजय वाघमारे यांनी दिली.
भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या कामाचा आढावा महामंडळातर्फे मंगळवारी केडीएमसी मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहाच्या दालनात घेण्यात आला. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, वाहतूक पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
वाघमारे म्हणाले की, या रस्त्याच्या सहापैकी दोन लेनचे काँक्रिटीकरणाचे बहुतांश काम झालेले आहे. जेथे काम पूर्ण झाले, त्यावरून वाहतूकही चांगल्याप्रकारे सुरू आहे. तिसऱ्या लेनचे काँक्रिटीकरण सुरू असून, जेथे वाहतुकीच्या काही समस्या असतील, तर तेथे ट्रॅफिक वॉर्डन नेमावेत, अशी सूचना मनपा व वाहतूक पोलीस शाखेला यावेळी त्यांनी केले. जेथे रस्त्यासाठी भूसंपादनाची गरज नाही, तेथे दोन लेनचे काम पूर्ण केले आहे. उर्वरित तीन लेनचे काम सुरू आहे. तसेच जेथे भूसंपादनाची आवश्यकता आहे तेथे नोंदी तपासून बाधितांना टीडीआर कसा दिली जाईल, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय व मनपा प्रशासनाची मदत घेऊन रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम पूर्णत्वास नेले जाईल.
-----------------