राजू काळे
भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील काही खाजगी तसेच अनुदानित शाळांनी ऐन दिवाळीच्या सुटीत विद्यार्थ्यांच्या मागे निधी संकलनाचे काम लावले आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांत नाराजी पसरली आहे. शहरात अडीचशेहून अधिक खाजगी, अनुदानित व स्थानिक प्रशासनाच्या शाळा आहेत. यातील खाजगी शाळांचा आर्थिक डोलारा विद्यार्थ्यांच्या देणगी व मासिक शुल्कातून सांभाळला जातो. तर, अनुदानित शाळांतील शिक्षकांचे वेतन राज्य सरकारकडून मिळत असले, तरी शाळांना देखभाल, दुरुस्तीसाठी लागणारी रक्कम विद्यार्थ्यांच्या मासिक शुल्कातूनच भागवली जाते. हे शुल्क खाजगी शाळांच्या तुलनेत कमी असते. तर, खाजगी शाळांचा आर्थिक व्याप आवक कमी तर खर्च जास्त, अशा ताळेबंदात अडकत असल्याने ते विविध माध्यमांतून निधी संकलित करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. सध्या तर शाळांचा दैनंदिन अथवा मासिक खर्च भागवण्यासाठी काही शाळा विद्यार्थ्यांमार्फत निधी संकलनाचा फंडा आजमावू लागले आहेत. या निधी संकलनामागे गरीब व गरजू कॅन्सर, एड्स, कुष्ठरोगी, अंध रुग्णांच्या उपचारासाठी खर्च केला जाणार असल्याचे कारण पुढे केले जाते. किमान ५० व्यक्तींकडून निधी संकलन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्तीकडून कमीतकमी १०१ रुपये निधी संकलित करण्याचे फर्मान शाळेने सोडले असून ५० ते २००० रुपये निधी संकलनासाठी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह कमाल पाच भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवण्यात आले आहे.हे काम विद्यार्थ्यांना बंधनकारक केल्यामुळे विद्यार्थी ओळखीच्या तसेच परिसरातील नागरिकांच्या घरोघरी निधी संकलनासाठी हिंडताना दिसू लागले आहेत. एकीकडे आधुनिक शिक्षणपद्धतीच्या नावाखाली दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले असताना यंदा ऐन दिवाळीच्या सुटीतच त्यांच्या हाती निधी संकलनाचे काम सोपवण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांत तीव्र नाराजी पसरली आहे.दिवाळीत तसेच दिवाळी संपल्यानंतर अनेक विद्यार्थी आपल्या कुटुंबासोबत गावी अथवा शहराबाहेर फिरावयास जातात. या निधी संकलनामुळे बहुतांश विद्यार्थी गावाला जाऊ शकलेले नाहीत. त्यातच, विद्यार्थ्यांना दिवाळीची सुटी संपताच संकलित केलेला निधी शाळेत जमा करायचा असल्याने मुदतीच्या आत काम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी दारोदार हिंडू लागले आहेत. विद्यार्थ्यांकडून संकलित होणारा निधी ठाणे येथील फाउंडेशन फॉर अर्बन अॅण्ड रूरल कम्युनिटी डेव्हलपमेंट, इंडिया संस्थेच्या हाती सोपवला जाणार असल्याचे विद्यार्थ्यांना दिलेल्या कागदावर छापण्यात आले आहे.विद्यार्थ्यांकडून दरवर्षी विविध मार्गाने निधी संकलित केला जातो. त्यासाठी मुलांना दारोदार हिंडायला न लावता प्रसंगी आम्हीच स्वत:च्या खिशातून निधी देतो. हा निधी कुठे खर्च केला जातो, त्याची कोणतीही माहिती शाळांनी आजपर्यंत दिलेली नसल्याने असे बेकायदा प्रकार बंद झाले पाहिजेत.- सुरेश सावंत, पालकआम्ही दिवाळीच्या सुटीत दिलेला गृहपाठ करून सुटीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. यंदाची सुटी आम्ही पैसे गोळा करण्यासाठी घालवू लागलो आहोत.- सर्वेश पेडणेकर, विद्यार्थीशाळांनी विद्यार्थ्यांमार्फत सुरू केलेल्या निधी संकलनासाठी शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक असतानाही कोणतीही माहिती दिलेली नाही. ज्या शाळांनी असे नियमबाह्य काम सुरू केले आहे, त्याचा आढावा घेऊन कारवाई केली जाईल.-भास्कर बाबर, शिक्षणाधिकारी