ठाणे - मुंबई-नाशिक एक्सप्रेस वे वरील पडघा ते शहापूर पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासंदर्भात ठाणेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व्हिस रोडचे काम, तसेच खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात देखिल झाली असून त्यामुळे वाहनधारकांना तसेच परिसरातील गावांमधील ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.
या रस्त्यावर पडघा टोल नाका येथे गेल्या आठ वर्षांपासून टोल वसुली सुरू आहे. परंतु, कंपनीने त्यावेळी ठरलेल्या करारनाम्यानुसार वेळच्या वेळी खड्डे भरणे, अंडरपास, सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुलांची कामे पूर्ण केली नसल्याने आतापर्यंत महामार्गावर शेकडो अपघात होऊन सहाशेच्या वर नागरिकांचा बळी गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण आहे. याबाबत शिवसेनेने वारंवार आंदोलने करूनही कंपनीने अपूर्ण कामे पूर्ण केली नाहीत. रक्षाबंधनच्या दिवशी आवरे येथील दोन बालकांचा खड्ड्यांमुळे अपघातात बळी गेल्यानंतर शिवसेनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे २१ सप्टेंबर रोजी शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने पडघा टोल नाक्यावर भव्य टोल बंद आंदोलन करण्यात आले होते. याची दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, टोल कंपनीचे अधिकारी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर श्री. शिंदे यांनी खड्डे भरण्याचे तसेच सर्व्हिस रोडचे काम तातडीने हाती घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
जव्हार फाटा सर्व्हिस रोड, वाशाला उड्डाणपूल,खर्डी गोलभन ते रेल्वे पुलापर्यंत सर्व्हिस रोड,भातसा उड्डाणपूल, कांबारे अंडरपास व सर्व्हिस रोड, शहापूर चेरपोली ते परिवार गार्डन हॉटेल दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड, आसनगाव परिवार हॉटेल उड्डाणपूल, खातिवली-वाशिंद एण्ट्री उड्डाणपूल, वाशिंद जिंदाल कंपनी समोर उड्डाणपूल व खातिवली ते जिंदाल कंपनी सर्व्हिस रोड, कांदली डोहाळे कोशिंबी अंडरपास, खडवली फाटा उड्डाणपूल, पडघा एण्ट्री अंडरपास व पडघा बायपास टोल नाक्यापर्यंत दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड, तळवली फाटा उड्डाणपूल, भोईरपाडा अंडर पास या सर्व मागण्यांची दखल श्री. शिंदे यांनी घेतली आहे. त्यांनी कडक भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सर्व मागण्या मान्य करून सर्व्हिस रोडचे काम तातडीने सुरू करून महिन्याभरात अंडरपासचे काम सुरू करण्याचे, तसेच मंजुरी मिळालेल्या सहा उड्डाणपुलांबरोबर उरलेल्या अन्य उड्डाणपुलांची मंजुरी मिळवून त्यांची कामे तीन महिन्यांत सुरू करण्याचे मान्य केले.
यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य हात माग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, शहापूर तालुकाप्रमुख मारुती धिर्डे, ग्रामीण संपर्कप्रमुख विष्णु चंदे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे रिजनल ऑफिसर राजीव सिंग, प्रोजेक्ट डायरेक्टर कोडसकर, टोल कंपनीचे जेफ फॉक्स, जफर खान आदी उपस्थित होते.