ठाणे : एकीकडे महायुती मध्ये कुठेही खदखद नसल्याचा दावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी केला असतांना दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या मनाचा कौल घेतला तेव्हा २०२४ मध्ये आम्हाला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून हवे अशी भावना व्यक्त केली. त्यावर तुम्हाला हव्या असलेल्या मुख्यमंत्र्यांसाठी कामला लागा असा सुचक इशारा त्यांनी दिला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या लोकसभा प्रवास अंतर्गत त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
भाजपच्या महाविजय २०२४ अभियानातर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ठाण्यात आले होते. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे त्यांनी ६०० वॉरीअर्सला मार्गदर्शन केले. यात ठाणे, ओवळा माजिवडा, कळवा मुंब्रा आणि कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची मन की बात जाणून घेतली. २०२४ मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवाय? बोला तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवाय? असा प्रश्न बावनकुळे यांनी पदाधिकाºयांना विचारला. त्यावर 'देवेंद्र फडणवीस' यांचे नाव कार्यकर्त्यांनी एकमुखाने घेतले. त्यावर आवाज येत नसून जोरात बोला असे बावनकुळे यांनी सांगितले. यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा ' देवेंद्र फडणवीस ' यांचे नाव घेतले. या मागणीनंतर बावनकुळे यांनी ' मग लागा कामाला ' असा सुचक इशारा कार्यकर्त्यांना दिला.
त्यानंतर ज्या ज्या पदाधिकाऱ्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती. त्यांना बोलावून सरल अॅप विषयी माहिती आहे का? आज त्यावर काय अपडेट आली आहे, आदीसह इतर प्रश्न त्यांनी उपस्थित केले. अनेकांनी त्याची उत्तरे देता आली नाही, त्यावरुन त्यांनी नाराजी तर व्यक्त केलीच शिवाय त्यांची कान उघाडनी केली. याशिवाय जो बुथ लेव्हलला काम करीत आहेत, त्याचा फोटो बॅनरवर नसतो. परंतु बॅनर लावतांना बुथ लेव्हलच्या पदाधिकाºयाचा मोठा लावा, व नेत्यांचे फोटो छोटे लावा अशी सुचनाही त्यांनी केली. त्यात त्यांचे भाषण सुरु असतांना स्टेजवर काही पदाधिकारी आपसात गप्पा मारत होते. त्यांची कान उघाडणी करतांना मी २० मिनिटे भाषण करणार असून ते शांत पणे ऐका आणि तुमच्या गप्पा बाहेर जाऊन मारा अशा शब्दात त्यांनी त्या पदाधिकाऱ्यांना सुनावले.