कल्याण : कल्याणनजीकच्या प्रसिद्ध मलंग गडावर जाण्यासाठी फ्युनिक्युलर ट्रॉली तयार करण्यात येत आहे. या ट्रॉलीच्या कामाला ऑगस्टमध्ये गती मिळणार आहे, अशी माहिती भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.
मलंग गडावर ट्रॉली बसविण्याचे काम बऱ्याच दिवसांपासून रखडले आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी कथोरे यांनी सार्वजनिक बांधकाम आणि वित्त विभागाचे अप्पर सचिव मनोज सैनिक यांच्यासोबत गुरुवारी बैठक घेतली. यावेळी त्यांनी काम रखडले असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले. या बैठकीत सुप्रीम एजन्सीला काय अडचणी येत आहेत, यावरही चर्चा झाली. ऑगस्टपासून पुन्हा ट्रॉलीचे रखडलेले काम सुरू करण्यात येणार आहे. हे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना सैनिक यांनी एजन्सीला दिल्या.
फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या कामाला २००७ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. खासगीकरणाद्वारे ही ट्रॉलीची व्यवस्था बांधा, वापरा, हस्तांतरित करा, या तत्त्वावर उभारण्यासाठी निविदा मागविली गेली. सुप्रीम एजन्सीची ४५ कोटी ९१ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. या एजन्सीला कामाचा कार्यादेश मिळताच ट्रॉलीच्या कामाला सप्टेंबर २०१२ मध्ये सुरुवात झाली.
दरम्यान, मलंगगड परिसर हा माथेरान इको झोन क्षेत्रात येत असल्याने या समितीने या प्रकल्पास २०११ ला मान्यता दिली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पासाठी स्थापन केलेल्या समितीनेही २०११ मध्ये मंजुरी दिली होती. वनखात्याचा ना-हरकत दाखला २००८ मध्ये मिळाला होता. प्रकल्प २४ महिन्यांच्या मुदतीत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण होत नसल्याने एजन्सीला २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. सप्टेंबर २०१९ पासून प्रकल्पाचे काम बंद होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. परंतु, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या प्रकल्पास गती देण्यासाठी कथोरे यांनी बैठक घेत त्याकडे सरकारचे वेधले.
----------------------