लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहराच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाणपुलाच्या गर्डरला स्टर्ड (खिळे) बसविण्यासाठी वेल्डिंग करावे लागणार असून, त्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, सध्याच्या कोविड काळात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यामुळे ऑक्सिजनअभावी या पुलाच्या कामात पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. परंतु, येत्या चार दिवसांत दोन गर्डरच्या खिळ्यांचे वेल्डिंग काम पूर्ण होऊन गर्डर बसविण्याचे काम सुरू होणार आहे.
कोपर पुलाच्या कामातील तांत्रिक अडचणीसंदर्भात शिवसैनिक राजेश कदम यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, औरंगाबादमधील एका कारखान्यात कोपर उड्डाणपुलाच्या गर्डरचे काम सुरू होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भावामुळे त्या कारखान्यातील काही कामगार संक्रमित झाले होते. परिणामी, काम बंद राहिल्यामुळे उर्वरित गर्डर येण्यास विलंब झाला. परंतु, आता अंतिम टप्प्यातील गर्डर डोंबिवलीत आले आहेत. ते बसविण्याचे काम झाल्यावर त्यावर स्टील प्लेट टाकण्यात येतील आणि त्यानंतर स्लॅबचे काम होईल. शेवटी डांबरीकरण केल्यावर कोपर पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला केला जाईल. कोपर पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.
----
शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार मंगळवारी मी आणि सागर जेधे यांनी कोपर उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला आहे.
- राजेश कदम, शिवसैनिक
--------------