सदानंद नाईक, उल्हासनगर: मध्यवर्ती रुग्णालयातील रिक्त डॉक्टरांच्या जागी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार स्थानिक स्तरावरुन ऑन कॉल बेसिसवर १६ डॉक्टरांना आरोग्य सेवेत घेतले. मात्र त्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने, डॉक्टरांनी गुरुवार पासून कामबंदची भूमिका घेतल्याने, रुग्णालयाचे कामकाज ठप्प पडून रुग्णांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, वांगणी, ग्रामीण परिसरातून शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. वर्षाला ६ हजार पेक्षा जास्त प्रसूती येथे होतात. मंजूर २ स्त्रीरोगतज्ज्ञ पदा पैकी १ रिक्त आहे. तर भुलतज्ञ, ईएनटी सर्जन, भिषक, मानसोपचारतज्ञ आदी डॉक्टरांचे पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन सुचनांनुसार स्थानिक स्तरावरुन ऑन कॉल बेसिसवर डॉक्टरांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे गोरगरीब व गरजू रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचे एकून ७८ लाख ४८ हजार ६०० रुपयांचे मानधन मिळाले नाही.
यामध्ये डॉ अशोक तंद्रा यांचे १४ लाख २२ हजार, डॉ रासेश सिंग यांचे ११ लाख ३८ हजार, डॉ नंदा सावंत यांचे १२ लाख ३४ हजार असे मोठया रक्कमेची मानधनाचा समावेश आहे. मानधन मिळत नसल्याने, काम कसे करणार? असा प्रश्न मानधनावरील डॉक्टरांनी केला. या थकीत मानधना बाबत रुग्णालयाचे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्राद्वारे माहिती दिली असून आरोग्य सुविधा कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
याबाबत डॉ बनसोडे यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल बंद होता. मध्यवर्ती रुग्णालयातील ऑन कॉल बेसिसवरील १६ डॉक्टरणांनी गुरवार पर्यंत मानधन न मिळाल्यास, कामबंद करण्याची भूमिका घेतला. गुरवार पासून या डॉक्टरणांनी कामबंद ठेवल्यास शस्त्रक्रिया विभाग, प्रसूतिगृह विभाग ठप्प पडून रुग्णांचे नातेवाईकांनी रुग्णांना इतरत्र हलविण्याची तयारी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी दिली. एकूणच रुग्णलायातील आरोग्य सेवा कोलमडल्यास गोरगरीब व गरजू रुग्णांना त्याचा सर्वाधिक फटका बसून कोणाच्या जिवावरही बेतण्याची शक्यता व्यक्त होत आहे.