अंबरनाथ : अंबरनाथमधून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या महिनाभरापासून हे कामही संथगतीने सुरू असल्याने रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच या रस्त्याच्या आड येणाºया सरकारी कार्यालयांचे अतिक्रमणही अद्याप न तोडल्याने या कामाला आणखी विलंब होत आहे.
कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण सुरू असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे हे काम बंद पडले होते. अर्धवट अवस्थेत असलेल्या या कामाला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली. महिनाभर काम झाल्यावर पुन्हा काही ठिकाणी काम थांबविण्यात आले. अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट सोडण्यात आला, तर काही ठिकाणी नाल्यावरील पुलाचे काम तसेच सोडून दिले आहे. हीच परिस्थिती महात्मा गांधी विद्यालयाजवळ नवीन भेंडीपाडा परिसर, मोरिवलीनाका परिसर आणि फॉरेस्टनाका याठिकाणी आहे. काम अर्धवट राहिल्याने येथे अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी नाल्याचे कामही अर्धवट सोडून देण्यात आले आहे.
याच रस्त्यावरील दुभाजकाचे कामही करण्यात आलेले नाही. सर्वात मोठा अडथळा हा अतिक्रमणांचा असून सरकारी कार्यालयांचे अतिक्रमणही अद्याप काढण्यात आलेले नाही. तहसील, महावितरण कार्यालय, अंबरनाथ नगरपालिका, पोलीस ठाण्याची संरक्षक भिंत हे काढण्यात आलेले नाही. खाजगी कंपन्यांच्या संरक्षक भिंतीही तशाच असल्याने रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. या कामाला गती मिळत नसल्याने हा रस्ता अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे.रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट सोडून देण्यात आले आहे. जुन्या रस्त्यावरही अनेक ठिकाणी पेव्हरब्लॉक खचले आहेत. या सर्व रस्त्यांची दुरुस्ती आणि उर्वरित कामाला वेग देण्याची गरज आहे. - प्रदीप पाटील, विरोधी पक्षनेते