नायगाव परिसरातील पूर्व-पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम मागील ४ वर्षांपासून सुरू आहे. एमएमआरडीए प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे कंत्राट सिम्प्लेक्स नामक कंपनीला देण्यात आले आहे. मात्र या पुलाच्या कामाला रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने पुलाचे काम मागील वर्षभरापासून रखडले होते. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.मागील वर्षी ९ डिसेंबर २०१९ रोजी पुलाच्या रखडलेल्या कामाला पुन्हा सुरूवात झाली, मात्र हाती घेतलेले काम पुन्हा काही कारणास्तव बंद करण्यात आले. या बंद पडलेल्या कामाला महिनाभरापासून पुन्हा सुरुवात झाली आहे. रेल्वेचे रूळ कोसळू नयेत म्हणून मायक्रो पायलिंगचे काम सध्या सुरू आहे. मात्र बरेच मजूर कोरोना आपत्तीमुळे गावी गेलेले असल्याने या कामासाठी आता मजूर उपलब्ध नाही. परिणामी हे काम संथगतीने सुरू आहे.सुनील घरत।
पारोळ : नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाºया उड्डाणपुलाचे काम मागील चार वर्षांपासून शासनाच्या उदासीन कारभारामुळे अपूर्ण राहिले आहे. आधीच नायगाव पूर्व परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशा काळात येथील लोकाभिमुख प्रश्नांना धसास लावण्यासाठी शासनाकडून ठोस प्रयत्न होण्याऐवजी आहेत तेच प्रकल्प संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हा पूल पुढील वर्षी मे २०२१ अखेरीस सुरू होण्याची शक्यता असून हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास वसई ते मुंबई हे अंतर २५ किलोमीटरने कमी होऊन वाहतूकदारांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.सध्या नायगाव पूर्वेकडील नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. पूर्वेतून पश्चिमेकडे आणि पश्चिमेतून पूर्वेकडे येताना नागरिकांना वसईला वळसा घालूनच पुढे जावे लागते. त्यामुळे नायगाव परिसरातील पूर्व-पश्चिम जोडणारा हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.या उड्डाणपुलाचे काम सतत या ना त्या कारणास्तव संथगतीने सुरू असल्यामुळे नायगाव परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत नाराजी पसरली आहे. पुढील वर्षी मे २०२१ अखेर हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास नागरिक, वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच वेळेचीही बचत होणार आहे.