ठाणे : पारसिकनगरला होत असलेल्या मलनि:सारण प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला असतानादेखील त्याचे काम सुरू झाल्याने शनिवारी स्थानिक नागरिकांनी ते बंद करावे, या मागणीसाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. मात्र, आयुक्तांनी कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मुख्यमंत्र्यांची स्थगिती असताना या प्रकल्पाचे काम सुरू असल्याबाबत नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर ही स्थगिती उठवण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. कळव्यातील पारसिकनगर येथे ठाणे महापालिका मलनि:सारण प्रकल्प उभारत असून त्याचे कामही काही महिन्यांपूर्वीच सुरू झाले आहे. मात्र, हा प्रकल्प भरवस्तीमध्ये होत असल्याने आरोग्याचा मुद्दा उपस्थित करून त्याला सुरु वातीपासून स्थानिक रहिवाशांचा विरोध आहे. यासाठी अनेक वेळा आंदोलनेदेखील करण्यात आली आहे. मात्र, या प्रकल्पाचे काम अजूनही थांबलेले नाही. निवडणुकीपुरते काही दिवस काम बंद केल्यानंतर पुन्हा एकदा ते सुरू करण्यात आले. शनिवारी पुन्हा एकदा या प्रकल्पाला विरोध करून नागरिकांनी आयुक्तांची भेट घेतली. सामाजिक कार्यकर्त्या ऋता आव्हाड आणि काही नागरिकांनी पालिका आयुक्तांची भेट घेऊन हा प्रकल्प रहिवासी परिसरात करू नये, अशी मागणी केली. प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती असतानादेखील त्याचे काम कसे काय सुरू ठेवले आहे, असा मुद्दा या नागरिकांनी उपस्थित केला. हा प्रकल्प रहिवासी भागातून स्थलांतरित करण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील त्याची चौकशी लावली होती. (प्रतिनिधी)
पारसिकच्या मलनि:सारण प्रकल्पाचे काम सुरूच राहणार
By admin | Published: April 16, 2017 4:25 AM