कल्याण : केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत २७ गावांतील पाणी समस्या दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. महापालिका व जिल्हा परिषदेत योजनेबाबत समन्वय नसल्याने कामाला गती नसल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी केला.
आमदार पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी आयुक्तांशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी सांगितले की, पाणीपुरवठा योजनेसाठी २८ ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारायच्या आहेत. २७ गावांत कल्याण ग्रोथ सेंटर आहे. कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये १० गावे समाविष्ट आहेत. त्या ठिकाणी टाक्याच्या जागांसाठी महापालिकेने एमएमआरडीएकडे पाठविलेल्या प्रस्तावात जागा गुगल मॅपद्वारे मार्क केल्या आहेत. या प्रकरणी एमएमआरडीने उत्तर दिलेले नाही. तसेच प्रस्तावाची प्रतही दिलेली नाही. योजना केंद्राची असली तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत त्याचे काम केले जात आहे. जिल्हा अधिकारी, एमएमआरडीए, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याशी महापालिकेचा समन्वय नसल्याने योजनेच्या कामाला गती नाही.
याशिवाय रिंगरोड प्रकल्पातील ८५० आणि ९० फुटी रस्त्यातील सहा बाधितांचे पुनर्वसन करावे. डोंबिवली नांदीवली मठाकडील रस्त्याचे काम मार्गी लावावे. मालमत्ता कराच्या थकबाकीवर महापालिकेने आकारलेल्या शास्तीत शंभर टक्के सूट देण्यात यावी. महापालिकेत समाविष्ट असलेल्या ९ गावांमधील मालमत्ताधारकांना महापालिकेने मालमत्तेची सुधारित बिले पाठवावीत. या मागण्या आमदार पाटील यांनी आयुक्तांकडे चर्चेदरम्यान केल्या. यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आयुक्तांनी आश्वासित केल्याचे पाटील यांनी सांगितले.
----------------------
(फोटो आहे)