डोंबिवली- येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केडीएमसीने कंत्राट दिले असून त्या ठेकेदाराने दोन, तीन महिन्यापासून पगार थकवल्याने महापालिकेच्या डोंबिवलीतील कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शहरातील सकाळच्या सत्रातील कचरा न उचलला गेल्याने बहुतांशी ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत.
डोंबिवलीत व कल्याण मध्ये 200 कंत्राटी कामगार कार्यरत असून 120 ड्रायव्हर कंत्राटी पद्धतीने काम करतात. त्यापैकी डोंबिवलीत सुमारे 200 कामगार कार्यरत असतात, त्या सगळ्यानी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. त्यामुळे स्वछता अधिकाऱ्यांची दाणादाण उडाली असून पोलीस बलाचे साहाय्य घेऊन त्यांना कामावर हजर करण्याचा मानस असल्याची माहिती स्वच्छता अधिकारी विलास जोशी यांनी लोकमतला दिली. ते म्हणाले की, आधी आयुक्त, उपायुक्त आदींसोबत चर्चा सुरू असून त्यातून तोडगा निघतो का हे बघावे लागेल. तसे प्रयत्न सुरू आहेत. काही वाहनांची हवा काढण्यात आली असून समस्या वाढली आहे. ठेकेदार म्हणतो की दोन महिन्यांच पगार राहिला आहे. तर कामगार म्हणतात, तीन महिन्यांचा पगार राहिला आहे. त्यात नेमके कोणाचे बरोबर याचीही माहिती दोन दिवस झाले मिळवत आहोत, असेही सांगण्यात आले.
कल्याणमध्ये मात्र अजून तरी या बंदच्या पवित्र्याचा परिणाम झालेला नसल्याचा दावा जोशी यांनी केला. डोंबिवलीत करचार्यांनी खंबाळपाडा येथे एकत्र येण्याचे आवाहन कंत्राटी कामगार संघटनेने केले आहे, या आंदोलनाला मनसे चा पाठींबा असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, आयुक्त गोविंद बोडके यांनी कामगार आणि ठेकेदार यांना खडे बोल सुनावले, जर जनतेला वेठीस धरून आंदोलन होणार असेल तर मग कायद्याचा बडगा उगारावा लागेल अशी तंबी दिल्यानंतर तातडीने आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.या आंदोलन संदर्भात महापौर विनिता राणे म्हणाल्या की, कामगारांचे पगार देणे ही ठेकेदारांची जबाबदारी आहे, त्यात पालिकेचा सबंध नाही. त्यामुळे जे आंदोलन झाले ते चुकीच्या पद्धतीने केले होते. पालिकेची कचरा वाहन गाड्या ही संपत्ती असून त्याची हवा काढणे हे संयुक्तिक नाही, आंदोलन का केले, कोणी केले त्यांना कोणत्या राजकीय पक्षाने सहकार्य केले. जनतेला वेठीला धरून संबंधित पक्ष देखील जनतेच्या नजतेतून उतरेल यात संदेह नाही, असेही सांगण्यात आले.