भिवंडी : यंत्रमाग कारखान्यातील कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. सावंदे व चाविंद्रा परिसरातील कामगारांनी मृत कामगाराच्या कुटुंबाला यंत्रमागमालकाकडून मदत मिळावी, या मागणीसाठी रविवारी सकाळी यंत्रमाग कारखाने बंद करून चाविंद्रा येथे भिवंडी-नाशिक मार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ येथे तणावाचे वातावरण होते. अचानक वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालक व प्रवाशांची गैरसोय झाली. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल केला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.शंकर यादव (३०) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तालुक्यात सावंदे गावातील यंत्रमाग कारखान्यामध्ये तो काम करत असताना शनिवारी रात्री अचानक यंत्रमागामध्ये विजेचा प्रवाह उतरून त्यास विजेचा धक्का लागला आणि तो खाली पडला. कारखान्यातील कामगारांनी त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत जाहीर केले. शंकर याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. कामगारांनी रोष व्यक्त करत कारखान्याचे काम बंद पाडले. संतप्त कामगारांनी भिवंडी-नाशिक मार्गावर रास्ता रोको आंदोलनही केले. त्यामुळे या मार्गावर सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत कामगाराच्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कामगारांनी वाहनांना जाण्यासाठी रस्ता मोकळा केला. या मार्गावर अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे शहर परिसरात वाहतूककोंडी झाली. ही वाहतूककोंडी दूर करण्यासाठी पोलिसांना दोन तास लागले.
कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 3:13 AM