कल्याण : आंबिवलीतील मोहनेनजीकच्या एनआरसी कंपनीच्या कामगारांच्या थकीत देण्यांचा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना अदानी ग्रुपने कंपनीच्या कामगार वसाहतींमधील घरे पाडण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे त्याला बुधवारी कामगारांनी विरोध केला करताच त्यांना हटविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकरणी पोलिसांनी २५ कामगारांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या दंडुकेशाहीचा कामगारांनी निषेध केला आहे.एनआरसी कंपनी १३ वर्षांपासून बंद असून, साडेचार हजार कामगारांची देणी कंपनीने अद्याप दिलेली नाहीत. कामगारांच्या १,३०० कोटींच्या थकीत देण्यांचा दावा दिल्लीतील ‘नॅशनल ट्रब्युनल कंपनी लॉ’ यांच्याकडे न्यायप्रविष्ट आहे. त्यावरील सुनावणी गुरुवारी, २१ जानेवारीला होणार आहे. मात्र, कंपनीची जागा अदानी ग्रुपने घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचा ठोस पुरावा कंपनी व्यवस्थापनाने कामगार संघटनांना सादर केलेला नाही.एनआरसीच्या कामगारांना प्रत्येकी ११ हजार रुपये विनाअटी, शर्तीवर देण्याची जाहिरात अदानी ग्रुपने दिली होती. मात्र, ही रक्कम घेण्यास कामगारांनी नकार दिला आहे. दुसरीकडे १५ दिवसांपासून कंपनीच्या वसाहतीतील जुने बंगले तोडण्याचे काम अदानी ग्रुपकडून सुरू आहे. त्यावर कंपनी व्यवस्थापनाने अधिकृत खुलासा केलेला नाही. या तोडकामाला कामगारांनी वारंवार विरोध केला आहे. न्यायालयाचा आदेश नसताना तसेच देणी देण्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना बुधवारी बुलडोझरद्वारे कामगार वसाहतीतील घरे पाडण्याचे काम सुरू होते. कामगारांनी त्यास तीव्र विरोध केला. तो मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी कामगारांवर लाठीचार्ज केला. तसेच महिला व पुरुष अशा २५ कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेऊन खडकपाडा पोलीस ठाण्यात ठेवले आहे. त्यात कामगार रामदास वळसे पाटील, भीमराव डोळस, अजरून पाटील, सीताराम शेट्टी, फरीदा पठाण, प्राजक्ता कुळधरण, आशा पाटील, अरविंद पाटील, मारुती दिघोडकर, चंदू पाटील, राजेश पाटील, प्रमोद बळीद, सुरेश पाटील, सोपान यादव यांचा समावेश आहे.
कामगारांकडून पोलिसांचा निषेध -- पोलिसांनी विनाकारण २५ कामगारांना अटक केल्याने त्याचा कामगारांनी निषेध केला आहे. पोलीस कंपनी व्यवस्थापनाला साथ देत आहे. कामगारांची देणी देण्याचा विषय न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाचे उल्लंघन करण्यात अदानी ग्रुपला पोलिसांची साथ असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.