ठाणे : कितीही डॉलर खर्च केले तरी श्रमिक कलावंतांची कला निर्माण होऊ शकत नाही. ही कला वृद्धिंगत झाली पाहिजे. ती पुढच्या पिढीपर्यंत नेली पाहिजे. सध्या चॅट जीपीटीचा जमाना आहे. त्यात कृत्रिम ट्यून मिळते, पण सृजन ट्यून ही श्रमिक कलावंतच बनवू शकतो, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. ठाण्यात मोठ्या नेतृत्वाची परंपरा आहे. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांच्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात हा कार्यक्रम होत आहे याचा आनंद आहे, अशा भावनाही शेलार यांनी व्यक्त केल्या.
बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे दोन दिवसीय श्रमिक कलावंतांच्या कला महोत्सवास सुरुवात झाली. त्याचे रविवारी शेलार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ते म्हणाले की, लुप्त होत चाललेल्या लोककलांचे पुनरुज्जीवन करणे आणि अन्य कलांना मानाचे स्थान दिले पाहिजे. गेल्या ८० ते ८५ दिवसांत या विभागाच्या माध्यमातून मी १७० कार्यक्रम केले.
श्रमिक कलावंतांनी सादर केल्या कला तृतीयपंथी, तमाशा कलावंत, गोंधळी, संबळ वादक, अंध दिव्यांग, पोतराज, वासुदेव, कोळी बांधव, तारपा कलावंत अशा शंभरहून अधिक श्रमिक कलावंतांनी कला सादर केल्या. महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी श्रमिकांची कलादिंडी काढण्यात आली होती.
जुने ज्ञानसाधना महाविद्यालयापासून सुरू झालेली कलादिंडी बाळासाहेब ठाकरे कलादालनात विसर्जित करण्यात आली. यावेळी शेलार यांच्या हस्ते सहा श्रमिक आणि कलाविकासासाठी योगदान देणाऱ्या गुणीजनांचा सत्कार करण्यात आला.
संस्कृती संवर्धनाचा प्रचार, प्रसार संस्कृती संवर्धनाचा प्रचार, प्रसार, कलावंतांना संधी आणि स्थान देण्याचे काम या कार्यक्रमातून करत आहे. या आर्थिक वर्षात १२०० कार्यक्रमांची रचना केली आहे. यावेळी खा. नरेश म्हस्के, आ. निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, संदीप लेले, सांस्कृतिक विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे आदी उपस्थित होते.