मीरारोड - यंत्रावर कामाचा अनुभव नसताना देखील स्टील वाटी बनवणाऱ्या यंत्रावर कामास लावलेल्या कामगाराची तीन बोटे तुटल्या प्रकरणी भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलिसांनी दोघं कंपनी भागीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद रबानी शेख हा अकुशल कामगार भाईंदर पूर्वेच्या गणेश इंडस्ट्रीयल इस्टेट मधील हिरेन मेटल ह्या स्टीलच्या कंपनीत कामास होता. यंत्रावर कामाचा अनुभव नसतानाही २१ सप्टेंबर रोजी स्टील वाटी बनविण्याच्या प्रेसिंग मशीन वर कामास लावले होते. हे काम जमणार नाही सांगून देखील त्याला काम करण्यास भाग पाडले.
काम करताना यंत्रात उजव्या हाताची तीन बोटे अडकून तुटली व रक्त वाहू लागले. शेख जोरजोरात ओरडू लागला. जोराने आरडाओरडा करू लागला. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तो पुन्हा ५ ऑक्टोबर रोजी कामावर गेला व लहान सहन कामे करू लागला. परंतु कंपनीचे भागीदार नरेश शाह व हिरेन शाह या दोघांनी शेख याला तुझे तू बघून घे , या पुढे उपचारचे आम्ही बघणार नाही असे सांगितल्यावर शेख याने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी नरेश शाह व हिरेन शाह वर १२ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.