लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : निविदा प्रक्रिया न राबविता कंत्राटदारांना कामे देऊन जनतेचे कोट्यवधी रुपये वाया घालविणारी ठाणे ही राज्यातील पहिली महापालिका आहे, अशी टीका भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी शुक्रवारी केली. ‘आपला दवाखाना’ प्रकल्पावरून महापालिका प्रशासनाची बेफिकिरी उघड होत आहे. ठाणेकरांनी कररूपाने भरलेल्या पैशांची सत्ताधाऱ्यांकडून बेसुमार उधळपट्टी सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.दिल्लीतील ‘मोहल्ला क्लिनिक’च्या धर्तीवर ‘आपला दवाखाना’ प्रकल्प सुरू झाला. मात्र, जनसेवेच्या नावाखाली आपले उखळ पांढरे करून घेण्याचा उद्योग महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाचा होता. एकीकडे महापालिकेने ३७ वर्षांत केवळ २८ आरोग्य केंद्रे उभारली. तब्बल चार लाखांची लोकसंख्या असलेल्या दिवा परिसरात महापालिकेचे आरोग्य केंद्र नाही. त्यात सुविधांची वानवा असताना ‘आपला दवाखाना’द्वारे ५० दवाखाने कंत्राटदारामार्फत उघडून कंत्राटदाराला १६० कोटी रुपये दिले जाणार आहेत. आता तर निविदा प्रक्रियेत नसलेल्या कंपनीलाच कार्यादेश देण्याचा उद्योग प्रशासनाने केला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.हे तर हिमनगाचे टोकआपला दवाखाना प्रकल्पाच्या कार्यादेशावरून उघड झालेला घोळ हे हिमनगाचे टोक आहे. महापालिकेत अनेक गैरप्रकार घडल्याची शक्यता आहे. पाच वर्षांत मंजूर केलेल्या निविदा, महापालिकेने केलेले करार, स्मार्ट सिटी कंपनीने केलेली कामे आदींची चौकशी करावी. कोट्यवधी खर्चून केलेल्या कामांचा करदात्यांचा काय फायदा झाला, हे सत्ताधारी व महापालिका प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी डावखरे यांनी केली.
ठामपात निविदा प्रक्रिया न करताच कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 1:34 AM