- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी झुलेलाल हायस्कुल याठिकाणी एकदिवसीय शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले असून आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या सिंधी माध्यमाच्या शाळा मुलांच्या संख्या अभावी बंद पडल्या व गुजराती माध्यमाची एकमेव शाळा अखेरची घटका मोजत आहे. शाळेतील विध्यार्थ्यांची व शाळेची गुणवत्ता वाढीसाठी विशेष उपक्रम शिक्षण विभागाने हाती घेतला. एनोबेल सोशल इनोव्हेशन फाउंडेशन या स्टार्टअप मार्फत सदरचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राजस्थान, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रात तिचे उपक्रम सुरू आहेत. महापालिका शाळांचे पारंपरिक सरकारी स्वरूप बदलून आधुनिक व आकर्षक शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी आयुक्त राजा दया निधी यांनी पुढाकार घेतला आहे.
महापालिकेची एक शाळा संपूर्ण कायापालट करणे व इतर शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी वर्षभर उपक्रम राबविण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. पूर्वतयारीसाठी सर्व शिक्षकांचे उद्बोधन कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रमला आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ सुभाष जाधव, प्रशासन अधिकारी भाऊराव मोहिते यांच्यासह महापालिकेचे १५० शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी आयुक्त दयानिधी यांनी शिक्षकांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. त्यात विद्यार्थी आपल्या जीवनातील एकूण कृतीशील जीवनाचा २० टक्के कालावधी शिक्षण घेण्यासाठी व्यतीत करतो. तरीही अनेकांना शिक्षणातून अपेक्षित मूलभूत क्षमता विकसित होत नाहीत. त्या क्षमता व कौशल्ये आत्मसात करण्यासाठी शिक्षकांच्या कृतीशील अध्यापनाची गरज त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व्यतित केलेल्या वेळेचा परतावा देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले. तसेच येत्या शैक्षणिक कालावधीत इनोबल संस्था पालक, शिक्षक यांच्या सहयोगाने विध्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी वर्षभर प्रयत्न करणार आहेत. सदरील संस्थांमार्फत एका शाळेचे भौतिक सुविधा वाढवून आदर्श शाळा निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. एनोबल संस्थेचे संस्थापक चिराग भंडारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व शिक्षकांना येत्या शैक्षणिक वर्षापासून काय काय करायचे याचे सूक्ष्म नियोजन व त्यासाठी आवश्यक विषयांची माहिती दृकश्राव्य माध्यमातून दिली.