कल्याण : आज जागतिक महिला दिन मोठय़ा उत्साहात साजरा होत असला तरी ‘बेटी बचाव’च्या केवळ गप्पा मारल्या जातात. अद्याप ही स्त्री भ्रूण हत्येचा डाग पुसला जात नाही. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या एका कुटुंबाने आपल्या घरी आलेल्या नन्ही परीचं स्वागत ढोलताशांच्या गजरात करून एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांचे हे पाऊल समाजासमोर आदर्श निर्माण करणारे आहे. आज प्रत्येक क्षेत्रत स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना त्यांच्यापेक्षा कांकणभर सरस कामगिरी करताना दिसत आहेत. संसाराच्या गाडयापासून ते स्पेसरॉकेट चालवण्यार्पयतच्या त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. एकीकडे नवदुर्गा आपल्या बळाच्या जोरावर दशदिशा व्यापून टाकत असताना दुसरीकडे मात्र स्त्री भ्रूण हत्येच्या माध्यमातून तिला संपवण्यासारखे दुदैवी प्रकारही घडत आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता कल्याणातील आहेर कुटुंबाने घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा परिसरात हे आहेर कुटुंबिय राहतात. काही आठवडय़ांपूर्वी त्यांच्याकडे कन्यारत्न चे आगमन झाले. या नन्ही परीला ढोलताशांच्या गजरात घरी आणण्याची तिचे बाबा किरण आहेर यांची इच्छा होती. मात्र घरी आणण्याच्या दिवशीच या चिमुरडीला कावीळ आणि तिच्या आईला डेंग्यु झाल्याने आहेर कुटुंबीय चिंतेत पडले होते. तिची आई एका रूग्णालयात आणि चिमुरडी एका रूग्णालयात अशी परिस्थिती होती. या दोघींनाही आपल्या आजारांवर मात केली. मग पूर्वी ठरल्याप्रमाणो या कुटुंबाने आपल्या चिमुरडय़ांचे ढोलताशांच्या गजरात आज जोरदार स्वागत केले. साईराज वाद्य पथकातील मुलींनी या नवदुर्गेचे आणि त्या मातृशक्तीसाठी असे काही वादन केले की ते पाहून सर्वजण अक्षरक्ष: थक्क झाले. एका स्त्रीशक्तीने या जगात नुकत्याच आलेल्या दुस:या एका स्त्रीशक्तीचे अशाप्रकारे केलेले स्वागत हे जितके दुर्मिळ तितकेच स्वागतार्ह म्हणावे लागेल. आहेर कुटुंबियांच्या या सुंदर संकल्पनेला साईराज वाद्य पथकांनेही कोणतेही मानधन न घेता उत्स्फुर्त साथ दिला. आहेर कुटुंबियानी समाजातील नकोशीला हवीशी करण्यासाठी घेतलेल्या सकारत्मक भूमिकेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. स्त्रीभ्रुण हत्येचा कलंक कायमचा पुसण्यासाठी आज आपल्या समाजाला अश्या शेकडो आहेर कुटुंबाची नितांत गरज आहे.
जागतिक महिला दिन विशेष : आहेर कुटुंबियांनी केले ‘नन्हेपरी’चे ढोलताशांच्या गजरात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 5:24 PM