लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सोमवारी ठाणे शहरात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. योगदिनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी योग वर्ग घेण्यात आले, तसेच पूर्वसंध्येला व्याख्यान झाले. यावेळी योगविषयी जनजागृती केली. दिवसभरात झालेल्या सर्व शिबिरात सुमारे पाच हजारपेक्षा जास्त योगप्रेमी मंडळाच्या विविध शिबिरात सहभागी झाले होते.
प्रतिवर्षीप्रमाणे घंटाळी मित्र मंडळाने जागतिक योग दिवसनिमित्ताने विविध शिबिरांचे आयोजन करून साजरा केला. त्या अंतर्गत काल योगदिनाच्या पूर्वसंध्येला "पतंजल योगसूत्रे भारतीय मानसशास्त्र" या विषयावर डॉ. श्रीराम आगाशे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सोमवारी योगदिनाची सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून विविध शिबिरांच्याद्वारे झाली. सकाळी ७.३० ते ८.३० या वेळात विशेष ध्यान वर्ग घेतला. योग विभाग प्रमुख श्रीकृष्ण म्हसकर यांनी यू ट्यूबवर त्याचा लाभ सुमारे हजार साधकांना दिला. दिवसभरात विविध संस्था, शाळा, कॉलेजेस यांचे विद्यार्थी आणि शिक्षक तसेच खासगी कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ऑनलाइन शिबिरे घेतली. काही ठिकाणी योग्य काळजी घेऊन व सरकारी सूचनांचे पालन करून प्रत्यक्ष वर्गाला आमच्या शिक्षकांनी मदत केली. एका खासगी कंपनीतील भारतभरातील ५०० पेक्षा जास्त सुतारकाम करणारे कारागीर सहभागी झाले होते. आयुष मंत्रालयाने दिलेला अभ्यासक्रम आणि मंडळाची खासियत असणारे काही योगप्रकार यांचा अंतर्भाव केला होता. मंडळाचे संस्थापक योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांनी घालून दिलेली परंपरा सर्व शिक्षक व कार्यकर्ते त्याच पावित्र्याने जपत आहेत आणि वृद्धिंगतसुद्धा करत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर योगकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचे श्रीकृष्ण म्हसकर यांनी सांगितले.
--------