- सदानंद नाईक
उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात सकाळीं साडे सात वाजता केंद्रीयमंत्री कपिल पाटील, संच्युरी रेयॉन कंपनीचे सीईओ ओ.आर. चिंतलांगे, सीएमओ एच.एस.डागर आदींच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा करण्यात आली. कोरोनामुळे गेली दोन वर्षे आषाढी एकादशीला मंदिर बंद होते. शहरातून व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून असंख्य दिंड्या मंदिरात आल्या होत्या.
उल्हासनगर कॅम्प नं-१ येथील उल्हास नदी किनारी बिर्ला ग्रुपनी सेच्युरी रेयॉन कंपनी उभी केल्यानंतर, स्थानिक नागरिक व कंपनीतील कामगारांसाठी उंच टेकडीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बांधले. तसेच मंदिर परिसरात संच्युरी रेयॉन कंपनी व महापालिकेने सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या. कंपनी प्रशासनाकडून सकाळी साडे सात वाहत केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी कंपनीचे सीईओ ओ आर चितलांगे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित असल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी माहिती दिली. यावेळी मंदिर विठ्ठल भक्तांनी व दिंड्यानी फुलून गेला होता.
शहाड गावठाण येथील निसर्गरम्य मंदिर परिसरात अनेक हिंदी व मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. महानायक अमिताभ बच्चन, शशी कपूर याच्या सुहाग या चित्रपटा हेच विठ्ठल मंदिर दाखविण्यात आले. ज्यांना विविध कारणाने पंढरपूर येथे आषाढ एकादशीला जाता येत नाही. ते विठ्ठलभक्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शहाड गावठाण येथील बिर्ला विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतात. तसेच शहरासह ग्रामीण परिसरातून असंख्य दिंड्या वाजतगाजत मंदिरात येतात. महापालिका स्वच्छतेसह सुखसुविधा पुरवीत असून उल्हासनगर पोलीस यांचा कडक पोलीस बंदोबस्त असतो. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड स्वतः लक्षण ठेवून होते.