ठाणे : नागपंचमीच्या दिवशी सापाला पूजले जाते; पण इतर दिवशी तो दिसताच त्याचा जीव घेतला जातो. वास्तवात साप हा शेतकऱ्याचा मित्र समजला जातो. साप दिसला की घाबरून किंवा गोंधळून न जाता सर्पमित्रांना बोलवा, असा सल्लाही सर्पमित्र किंवा निसर्ग अभ्यासकांकडून दिला जातो.
जिल्ह्यात आढळणारे विषारी साप
१) नाग ( Spectacled Cobra )
२) घोणस (Russell''s Viper )
3) फुरसे (Saw-scaled Viper )
४) मण्यार (Common Krait)
५) चापडा (Bamboo pit Viper )
जिल्ह्यात आढळणारे बिनविषारी साप
१) धामण (Rat snake )
२) अजगर (Rock Python)
३) डुरक्या घोणस (Sand Boa )
४) मांडूळ किंवा दुतोंड्या (Red Sand Boa)
५) तस्कर (Common Trinket Snake )
६) कुकरी (Banded Kukri snake )
७) रुका साप (Brinzeback Tree Snake )
८) कवड्या साप (Common wolf snake )
९) दिवड (Checkred Keelback)
१०) नानेटी(Striped Keelback)
११) मांजऱ्या साप (Common Cat snake)
१२) हरणटोळ (Vine Snake )
१३) वाळा (Worm Snake )
साप शेतकऱ्यांचे मित्र
शहरातल्या लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांचा सापांशी जास्त संबंध येतो. शेतात, शिवारात साप, नाग नेहमी असतात. थोडी काळजी घेतली तर या सापांपासून त्रास होत नाही. सापांचे मुख्य अन्न उंदीर आहे आणि शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा उपद्रव उंदरांचा होतो. उंदरांची एक जोडी एका वर्षात ८०० पिल्ली जन्माला घालते ,पण सापांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. एक उंदीर शेतातले दहा ते बारा किलो तांदूळ/ धान्य आपल्या बिळात साठवतो. साप त्याच्या बिळात शिरून त्याला खातो. मानवनिर्मित कोणतेही रासायनिक विष इतक्या प्रभावीपणे उंदराचा नाश करू शकत नाही. म्हणून साप शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे
सापाशी गाठ पडली तर...
साप दिसल्यावर आपण जितके घाबरतो, गोंधळतो, तितकाच सापही घाबरलेला असतो. कोणत्याही वन्यजिवाप्रमाणे साप आधी पळून जायचा, स्वत:चा जीव वाचवायचा प्रयत्न करतो. मात्र, ते न जमल्यास प्रतिक्रिया म्हणून फुत्कारणे, फणा काढणे, शरीर वर उचलणे असे प्रकार करतो. साप दिसला तर घाबरून त्याच्यावर दगड, काठ्या, सळी किंवा अन्य काही मारू नका, त्यात तो जखमी होऊन चिडण्याची आणि त्यामुळे चावण्याची शक्यता असते. जर तुम्हाला विषारी का बिनविषारी हे ओळखता आले, तरच साप पकडण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा सर्प मित्राला बोलावून योग्य पध्दतीने, काळजी घेऊन साप पकडून, त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडावा, असे निसर्ग अभ्यासक सांगतात.
साप म्हटल्यावर सगळ्यात आधी भीती वाटते आणि तो मारायची घाई सुरू होते, कारण आजही सापांची ओळख सगळ्यांना नाही. संपूर्ण भारतात २७८ प्रकारचे साप आढळतात. मात्र, फक्त ५० प्रकारचे साप विषारी (म्हणजे माणसांना घातक) आहेत, पण हिंदी सिनेमांतून दाखवलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे साप डुख धरतात, सूड घेतात, इच्छाधारी साप माणसाचे रूप घेतात, सापांच्या डोक्यावर तेजस्वी मणी असतो, या सगळ्या काल्पनिक गोष्टींमुळे सापांविषयी गूढ, रहस्यमय समजुती लोकांमध्ये रुजल्या आहेत. त्या दूर करून सापांचे रक्षण केले पाहिजे. साप हे निसर्गचक्राचा हिस्सा आहेत, ते माणसांचे शत्रू नाहीत. उलट मदतकर्ते आहेत हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. नागपंचमी हा सण आपल्या पूर्वजांनी या उपयुक्त प्राण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरू केला. मात्र, फक्त नागपंचमीला सापाची, नागाची पूजा करायची आणि इतरवेळी मारायचे असे करून कसे चालेल?
- मकरंद जोशी (निसर्ग अभ्यासक)
साप चावलाच तर...?
ज्या व्यक्तीला साप चावला आहे, त्याला धीर द्यावा, ती व्यक्ती खूप घाबरली तर रक्तदाब वाढून, हृदयाकडे वेगाने रक्तपुरवठा होऊन विष झटकन शरीरात पसरू शकते. साप चावलेल्या व्यक्तीला अँटी व्हेनम डोस (विष प्रतिबंधक लस) देणे हाच खात्रीशीर उपाय आहे, त्यासाठी ताबडतोब वैद्यकीय मदत मिळवावी. ती येईपर्यंत सर्पदंशाच्या जागेकडून हृदयाकडे जाणाऱ्या भागावर (पोटरीला चावला तर मांडीवर आणि हाताला चावला तर दंडावर) हलक्या पद्धतीने रुमाल/ कपडा आवळून तेथील रक्त प्रवाहाची गती कमी करण्याचा प्रयत्न करावा. मात्र, अशा प्रकारे बांधलेला रुमाल करकचून आवळू नये.