कल्याण: नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गात बाधित होणा-या शेतजमिनींना योग्य मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ कल्याण तालुक्यातील शेतक-यांनी बुधवारपासून येथील प्रांत कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण छेडले आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.कल्याण तालुक्यातील राया, निंबवली, गुरवली, उतणे, नडगाव, दानबाव, फळेगाव, उशीद, पितांबरे, चिंचवली या गावातील शेतक-यांच्या जमिनी समृध्दी महामार्गात बाधित होत असून या प्रत्येक गावासाठी जमिनीचा वेगवेगळा मोबदला ठरविण्यात आला आहे. हा एकप्रकारे अन्याय असून समृध्दी महामार्गाबाबत थेट खरीदी १० ते १२ टकके खरेदीखत झालेली असलीतरी या खरेदीच्या अनुषंगाने शेतक-यांमधील फुट पाडण्यासाठी काही घटकांना हाताशी धरून प्रशासनाने व सरकारच्या माध्यमातून शेतक-यांची दिशाभूल करीत हे खरेदीखत केलेले आहेत. यामध्ये बहुतांशी स्थानिक शेतकरी नसून ज्या बाहेरील धनिकांनी शेतक-यांची दिशाभूल करून जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्या धनिकांच्या जमिनीचे खरेदीखत केल्याकडे शेतकरी समितीचे जयराम मेहेर यांनी लक्ष वेधले आहे. सर्वात जास्त दर राये महसुली गावासाठी रूपये ३ लाख २ हजार प्रती गुंठा इतके जाहीर केलेला आहे पण या गावाची फक्त २० गुंठे जमिन संपादीत होणार आहे. याच गावच्या शेतीच्या बांधाला बांध लागून असलेल्या निम्बवली महसुली गावाला राये गावापेक्षा निम्मा दर ठेवून या गावच्या शेतक-याची शासनाकडून फसवणूक होत असल्याचे मेहेर म्हणाले. मौजे गुरवली व मौजे चिंचवली या दोन गावांसाठी प्रती गुंठा २ लाख ३२ हजार दर जाहीर केलेला आहे. मौजे नडगावसाठी २ लाख ४६ हजार प्रती गुंठा जाहीर केला आहे. तसेच मौजे पितांबरे, फळेगाव, उतणे या तीन महसुली गावांचा थेट खरेदीचा दर जाणून नुजून उशीराने जाणिवपूर्वक जाहीर करून सरकारने बाधितांची फसवणूक केली आहे. त्यात शेतक-यांच्या एकजुटीत तोडा-फोडा या नितीचा अवलंब देखील केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या शेतक-यांचा आहे. यासंदर्भात कल्याण उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता आमची बोलणी उपोषणाला बसलेल्या शेतक-यांसोबत सुरू असल्याचे सांगितले.
या आहेत बाधित शेतक-यांच्या मागण्यातालुक्यातील एकुण गावांची सरासरी काढून किमान ५ लाख रूपये गुंठा असा समान दर बाधित शेतक-यांच्या देणेत यावा. बिनशेतीचा दर किंवा महामार्गाचा दर देण्यात यावा. बाधित शेतीमध्ये असलेली झाडे, विहीर, घरे यांची प्रत्यक्ष साताबा-यासह जाहीर करावा. ज्या शेतक-यांनी मागील भावात खरेदी केलेले आहेत त्यांनाही नविन दराप्रमाणे मोबदला देण्यात यावा. ज्या गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या गुरचरणीची जमिन महामार्गात जात आहे. त्या जमिनीचा मोबदला त्या गावाच्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करावी व गुरचरनीवर ज्या ग्रामस्थांची राहती घरे आहेत ती महामार्गात बाधित होत असतील त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. महामार्गामध्ये जमिनी गेल्या त्यामुळे काही शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यांना शेतकरी असल्याचा दाखला मिळावा व कल्याण तालुक्यामध्ये बागायती शेतीचे दर जाहीर झालेले नाहीत ते जाहीर करण्यात यावे, तीस गुंठयाचे क्षेत्र असेल आणि त्यात २० गुंठे महामार्गात जात असलेली व उरलेली १० गुंठे जागा महामार्गाला लागून असेलतर शासनाने ही जमिन खरेदी करावी अशा मागण्या नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग संघर्ष समिती कल्याण तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.