महेंद्र सुकेठाणे : ठाणे खाडी नवनव्या पक्ष्यांचे दर्शन देणारा महत्त्वाचा परिसर ठरत असून, स्थलांतरित विदेशी पाहुणे पक्षीमित्रांचे आकर्षण ठरत आहे. पर्यटकांना खाडी दाखवणाºया भरत खेडेकर यांना शुक्रवारी असाच एक नवा पक्षी दिसला. लगेच त्यांनी निसर्ग छायाचित्रकार आणि पक्षीअभ्यासक डॉ. सुधीर गायकवाड यांना फोन करून बोलावले आणि वाट चुकलेली ‘राखाडी डोक्याची टिटवी’ डॉ. गायकवाड यांच्या कॅमेºयात बंदिस्त झाली.कांदळवन विभागाने पुढाकार घेऊन ऐरोली-भांडुप येथील कोळी बांधवांना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे मासेमारी करणाºया कोळी बांधवांना, ठाणे फ्लेमिंगो अभयारण्यात येणाºया पर्यटकांना पक्षी दाखवून उत्पन्नाचे पर्यायी साधन प्राप्त झाले. भरत खेडेकर त्यापैकीच एक. त्यांना आज एक वेगळाच पक्षी दिसल्याने त्याचे छायाचित्र काढले जावे म्हणून डॉ. सुधीर गायकवाड यांना फोन केला. लगेच डॉ. गायकवाड यांनी भांडुप पंपिंग स्टेशनवरून ठाणे खाडी गाठली. भरत यांनी गायकवाड यांना होडीत बसवून आठव्या मिनिटांत पक्षी असलेल्या ठिकाणी घेऊन गेला. तो पक्षी म्हणजे राखाडी डोक्याची टिटवी (ग्रे हेडेड लॅपविंग) असल्याचे ओळखले. ठाणे खाडीत वाट चुकून आलेल्या (व्हॅगरन्ट) पाहुण्याचे मनसोक्त छायाचित्रण गायकवाड यांनी केले.राखाडी डोक्याची टिटवीची वीण उत्तर पूर्व चीन व जपानमध्ये होते. हिवाळ्यात हे दक्षिण-पूर्व आशिया व उत्तर-पूर्व भारतात स्थलांतर करतात. ३४-३७ सेंमी लांब असलेल्या या पक्ष्याचे डोके व मान राखाडी रंगाचे असते, पोट पांढुरके व छातीवर गडद राखाडी रंगाचा पट्टा असतो, असे डॉ. गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले. हा एकटा-दुकटा असलेला, वाट चुकून आलेला पाहुणा अजून किती दिवस ठाणे खाडीत राहील, हे मात्र सांगता येत नाही. ठाणे खाडीत अनेक दुर्मीळ पक्षी नियमितपणे हजेरी लावतात. पक्षीप्रेमींसाठी ‘ठाणे खाडी’ पर्यटकांचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. त्यात वाट चुकून का होईन, पाहुणी म्हणून आलेल्या टिटवीने ठाणे खाडीत येऊन येथील पक्षीवैभवात भर टाकली आहे.
वाट चुकून आला दुर्मीळ परदेशी पाहुणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:11 AM