ठाणे : लेखक, कवींवर आजूबाजूच्या वातावरणाचा, महान व्यक्तिच्या विचारांचा प्रभाव असतो. ते त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. मात्र समीक्षकांवर कसला प्रभाव-प्रेरणा असतात, हे तपासण्याची गरज आहे. काही समीक्षक उगाचच एखाद्या लेखक-कवीला मोठे ठरवतात. आणि कालांतराने त्या लेखक-कवीलाही आपण फार मोठे असल्याचे वाटू लागते. अशी कवी, लेखक आणि समीक्षकांची महाराष्ट्रात अनेक रॅकेट आहेत. ती साहित्याच्या दृष्टीने चिंताजनक आहेत, असा आरोप ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर यांनी केला. मराठी ग्रंथ संग्रहालयात रविवारी झालेल्या नवव्या ठाणे जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे शेवटचे सत्र ‘साहित्य निर्मिती आणि समीक्षा : परस्पर पूरक’ या विषयावर रंगले. यावेळी वक्ते म्हणून ते बोलत होते. त्यात डॉ. अनंत देशमुख, डॉ. कैलास जोशी यांनीही भूमिका मांडली. समीक्षा आणि साहित्याचा प्रवास परस्परांना पूरक असून तो मानवी जाणीवा निर्माण करणारा आहे. समीक्षा ही मूळ साहित्यातील सौंदर्य वाचकांना दाखवते. लेखक केवळ वास्तवाचेच चित्रण करतो असे नाही; तर त्याच्या लेखणीतून उतरलेल्या काही गोष्टीही वास्तव बनतात, असे मत अनंत देशमुख यांनी व्यक्त केले. साहित्य निर्मिती हीच समीक्षेचे मुख्य कारण आहे. साहित्याची निर्मिती झाली नसती, तर समीक्षा तयार झाली नसती. त्यामुळे साहित्य आणि समीक्षा एकमेकांना परस्पर पूरक आहेत का? हा प्रश्नच असू शकत नाही, असे मत कैलास जोशी यांनी मांडले. या संमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावर कोमसाप आणि मसाप एकत्र असून आपसातील काही तंटे असतील, तर बाजूला ठेवून साहित्याच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आहोत आणि येऊ, असे आश्वासन अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिले. यावेळी अरूण म्हात्रे, पद्माकर शिरवाडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
लेखक, समीक्षकांचे महाराष्ट्रात रॅकेट
By admin | Published: January 09, 2017 6:49 AM