ठाणे : येथील चंदनवाडी शिवसेना शाखेत झालेल्या लसीकरण शिबिराला परवानगी देणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भाजपाचे नगरसेवक नारायण पवार यांनी पत्रव्यवहार करुन थेट पंतप्रधानांना साकडे घातले आहे.
केंद्र सरकारने पुरविलेल्या मोफत लसींच्या माध्यमातून शिवसेनेच्या एका लोकप्रतिनिधीने राजकीय अजेंडा वापरून लसीकरण शिबिराच्या ठिकाणी शिवसेनेचे झेंडे व बॅनर झळकवत शिवसेनेनेच लस दिल्याचा दिखावा केल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे. या प्रकाराला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी साथ दिली, असा आरोप त्यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात केला आहे. ठाणे महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चंदनवाडी येथील शिवसेना शाखेत २३ जून रोजी लसीकरण शिबिर भरविण्यात आले होते. या शिबिरासाठी ठाणे महापालिकेने मोफत लस पुरविली. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर महापालिकेचा छोटा लोगो लावण्यात आला. मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी बॅनरवर शिवसेना नेत्यांची छायाचित्रे व मंडपात शिवसेनेचे झेंडे लावण्यात आल्याचे आरोप त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
या शिबिरात लस देण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा वापरण्यात आली. एकिकडे लस घेण्यासाठी गरजू नागरीक प्रतिक्षेत असताना, शिवसेनेच्या मर्जीतील नागरीकांना लस दिली गेल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. याशिवाय या शिबिरासाठी को-विन अँपवर आगाऊ अपॉईंटमेंटही दिल्या गेल्या नसल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्तेचा गैरवापर करून शिवसेनेच्या चंदनवाडी कार्यालयात लसीकरण शिबिर झाल्याचे नमुद करुन या शिबिराला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडेही तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले.