ठाणे : विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असून जगातील २९४ भाषांमध्ये तो उपलब्ध आहे. यामध्ये आजघडीला इंग्रजी, हिंदी, कन्नड भाषांचे जितके लेख, संदर्भ, साहित्य, दुर्मीळ ग्रंथ, शब्दांचे अर्थ वाचायला मिळतात, त्या तुलनेत मराठी भाषेतील साहित्य कमी पडले आहे. मराठी साहित्यच नाही, तर मराठी समाज विकिपीडियावर लेखनात मागे आहे, अशी खंत विकिपीडियाविषयक तज्ज्ञ सुबोध कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
राज्य मराठी विकास संस्था आणि मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांच्यातर्फे दुर्मीळ ग्रंथसंपदेच्या संगणकीकरणाची कार्यशाळा शनिवारी मराठी ग्रंथसंग्रहालयात पार पडली. या कार्यशाळेच्या दुपारच्या सत्रात ‘विकिमीडिया व इतर ज्ञानस्रोतांसाठी संगणकीकरण’ या विषयावर सुबोध कुलकर्णी हे बोलत होते. इंग्रजी विकिपीडिया हा २००१ मध्ये सुरू झाला, तर मराठी विकिपीडियाची सुरुवात २००३ मध्ये झाली. आज इंग्रजी विकिपीडियावर सुमारे ५७ लाख लेख आहेत, तर मराठी विकिपीडियावर केवळ ५२ हजार लेख आहेत. विकिस्रोत अर्थात संदर्भ साहित्याबाबत आकडेवारी पाहिली, तरी इंग्रजीत सहा लाखांहून अधिक, मल्याळम्, बंगालीमध्ये १५ हजारांच्या आसपास पाने आहेत, तर मराठीची केवळ १४०० पाने आहेत. विक्शनरीतही इंग्रजी, तमिळ, कन्नड, हिंदी या भाषांची लाखोंमध्ये पाने आहेत आणि मराठीची केवळ १६०० पाने आहेत, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. यावेळी उपस्थित इतर ग्रंथपालांच्या प्रश्नांनाही कुलकर्णी यांनी उत्तरे दिली.
लिहिते व्हा! : विकिपीडियावर निष्पक्षपाती, तटस्थ, सर्वसमावेशक, दिलखुलास, बिनधास्त लिहावे लागते. अशा प्रकारचे तटस्थ आणि काळाला अनुरूप लेखन करण्यात इंग्रजीबरोबरच हिंदी, तमिळ, कन्नड आघाडीवर आहे; मात्र मराठी माणूस मागे आहे, हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी लिहिते झाले पाहिजे. मराठीतील खात्रीशीर आणि नवीन माहिती विकिपीडियावर टाकली पाहिजे, असे कुलकर्णी यावेळी म्हणाले.