प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरातील पूर्व-पश्चिम जोडणारा आणि महत्त्वाचा मानला जात असलेला कोपर रेल्वे उड्डाणपूल धोकादायक पूल वाहतुकीसाठी १५ सप्टेंबर २०१९ पासून बंद करण्यात आला. या मार्गावरून ये-जा करणारी वाहतूक तेव्हापासून ठाकुर्ली उड्डाणपुलावरून सुरू झाली आहे. एकूणच झालेल्या बदलात वाहतुकीचे नियम सुरळीत चालू राहावे म्हणून डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानकाजवळच्या चिपळूणकर पथ, मंजुनाथ विद्यालय परिसरातील रस्त्यासह फडके मार्ग एकदिशा करण्यात आला आहे; परंतु वाहनचालकांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होताना याठिकाणी दिसून येते. शॉर्टकटसाठी राँग साइड चुकीची असताना ही वेळेची बचत जीवघेणी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कमकुवत झालेला कोपर पूल बंद करा, असे पत्र केडीएमसीकडून वाहतूक पोलीस विभागाला मिळताच तत्काळ पूल बंद करीत शहरातील वाहतूक बदलाची अधिसूचना त्यांच्याकडून जारी करण्यात आली. पर्यायी ठाकुर्ली पुलावर वाहतुकीचा वाढलेला ताण पाहता या पुलाच्या आजूबाजूचे बहुतांश रस्ते एकदिशा मार्ग करून वाहतुकीचे नियमन सुरळीत सुरू ठेवले आहे. दरम्यान, कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच रस्त्यावर वाहनांच्या वाढलेल्या गर्दीत वाहनचालक सरार्स नो एंट्रीत घुसून वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत स्वत:चा जीव धोक्यात घालताना पाहायला मिळत आहे. राँग साइडने वाहने चालविणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात असल्याचा दावा वाहतूक पोलीस विभागाकडून केला जातो; परंतु याउपरही वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे होत असलेले उल्लंघन पाहता आश्चर्य व्यक्त होत आहे.
------------------------------------------------------
मशाल चौक : ठाकुर्ली उड्डाणपुलावर मंजुनाथ विद्यालयाकडून नो एंट्री असतानाही त्याठिकाणाहून सर्रास वाहने चालविली जात आहेत.
अपघातांना निमंत्रण - मशाल चौकातून उलट्या बाजूने वाहने येत असल्याने सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्यावेळी वाहतूककोंडीची समस्या त्याठिकाणी दिसून येते. यात अपघातही होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
पोलीस कायम असावा - याठिकाणी सकाळ, संध्याकाळ नियमांचे होत असलेले उल्लंघन पाहता राँग साइडने वाहन चालविणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात असावा. कधी सकाळी तर कधी संध्याकाळी याठिकाणी पोलीस दिसून येतो.
---------------------------------------------------
फडके रोड : पूर्वेकडील फडके रोडवर बाजीप्रभू चौकातून मदन ठाकरे चौकाच्या दिशेने वाहने येण्यास मनाई आहे. त्याचेही उल्लंघन वाहनचालकांकडून होत आहे. येथे भाजी मार्केट आणि मोठमोठी व्यापारी दुकाने असल्याने याठिकाणी नागरिकांची वर्दळ असतेच त्याचबरोबर नो एंट्रीत घुसणाऱ्या वाहनांनीही कोंडी होते.
अपघातांना निमंत्रण- फडके मार्गावर सकाळ, संध्याकाळ सदैव वर्दळ असते. त्यात आजूबाजूला अरुंद रस्ते असल्याने नो एंट्रीत घुसखोरी करणाऱ्या वाहनांकडून अपघात होण्याची शक्यता आहे.
पोलीस कारवाईत व्यस्त - याठिकाणी एक ते दोन वाहतूक पोलीस असतात; परंतु आधीच वर्दळीचा रस्ता असल्याने त्याठिकाणी होणारी कोंडी सोडविताना त्यांची दमछाक होते. नो एंट्रीत घुसणाऱ्यांना दंड ठोठावला जातो; परंतु याठिकाणी मोठी कारवाईची मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसविला पाहिजे.
------------------------------------------------------
चिपळूणकर पथ : मानपाडा या मुख्य रस्त्याला जोडणारा हा रस्ताही एकदिशा मार्ग आहे; परंतु याठिकाणीही वाहनचालकांकडून नियम धाब्यावर बसविले जातात. वाहतूक पोलीस आणि सामाजिक संघटनांकडून गांधीगिरी करत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन नियम पाळण्याचे आवाहन केले होते; परंतु परिस्थिती आजही जैसे थे आहे.
अपघातांना निमंत्रण - या मार्गावरील गणेश कोल्ड्रिंगच्या परिसरात वळण आहे. त्यामुळे नो एंट्रीचा नियम मोडून येणारे वाहन वळणावर दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्यास ते वाहन कारणीभूत ठरू शकते.
पोलीस तैनात असावेत- हा मार्ग मुख्य आणि रहदारीचा असल्याने याठिकाणी तीन ते चार पोलीस कारवाईसाठी ठेवणे अपेक्षित आहेत; परंतु अपुऱ्या मनुष्यबळात याठिकाणी एक किंवा क्वचित प्रसंगी दोनच पोलीस असतात. त्यांची संख्या वाढावी.
------------------------------------------------------
राँग साइडने झालेले अपघात
मृत्यू - 0, जखमी 0
------------------------------------------------------
दंडात्मक कारवाई; पण नियमांचे उल्लंघन सुरूच
राँग साइडने वाहन चालविणाऱ्यांविरोधात आमच्याकडून दररोज दंडात्मक कारवाई केली जाते, असा दावा पोलिसांकडून केला जातो. यातून मोठ्या प्रमाणात दंड वसूल होतो; पण या कारवाईनंतरही वाहतूक नियमांचे उल्लंघन जैसे थे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, दंडात्मक कारवाईची माहिती मिळू शकलेली नाही.
नियम तुमच्या सुरक्षिततेसाठीच
वाहतुकीचे नियम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच असतात. आपल्या एका चुकीमुळे वाहनचालकांनी स्वत:चा अथवा इतरांचा जीव धोक्यात घालू नये. नियमांचे काटेकोरपणे पालन करा. नियम पाळणे आवश्यक आहे. आमची कारवाई नियम मोडणाऱ्यांविरोधात सतत सुरूच असते; पण वाहनचालकांनीही नियम पाळून सहकार्य करावे जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ येणार नाही. नो एंट्रीसह हेल्मेट वापरणे, नो पार्किंगचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे.
- उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली वाहतूक विभाग
-----------------------------------------------------------------------