ठाणे : कोरोनामुळे सर्वत्र नैराश्य आणि ताणतणावाचे वातावरण पसरले आहे. या मानसिक ताणतणावातून मुक्ती साठी ठाण्यात पहिल्यांदाच विनोदी संमेलन रंगणार आहे. रसिकांना खळखळून हसविणारे हे संमेलन जानेवारी महिन्यात ऑनलाइन होणार आहे. विनोद ह्या विषयाला केंद्रस्थानी ठेवून नऊ विविधरंगी सत्रे, ज्यात दिग्गज विनोदी लेखक भेट, विनोदी कवी संमेलन, विनोदाच्या विविध पैलूंचा अभ्यासू वेध, विनोदी प्रहसने, व्यंग चित्रावर अनोखी मुलाखत, परिसंवाद आणि अनेक नावीन्य पूर्ण भेटी रसिक प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत.
२०२१ ची सुरुवात प्रसन्न आणि सकारात्मक व्हावी ह्य उद्देशाने अजेय संस्था ' या, हसूया!' हे पाहिले विनोदी संमेलन २४ ते २६ जानेवारी २०२१ असे तीन दिवस हे ऑनलाइन संमेलन चालणार आहे. सकाळी १० ते रात्री ९ अशी प्रत्येक दिवसाची वेळ असणार आहे. ह्याची संकल्पना, आखणी लेखक दिग्दर्शक डॉ.क्षितिज कुलकर्णी ह्यांची असून गौरव संभूस हे निर्माता आहेत. टीम अजेय ह्या संमेलनाचे व्यवस्थापन पहात आहे. विनोदावर आधारित निबंध वाचन, विनोदावर आधारित काव्य संमेलन, विनोदी कथाकथन, व्यंगचित्रकार मुलाखत, विनोदी कलाकार मुलाखत, उत्स्फूर्त सत्र, परिसंवाद, विनोद व त्याचे फॉर्म यावर उद्बोधक सत्र, मराठी व इतर साहित्यातील विनोदावर रंगतदार सत्र, अजेय युवा टीम तर्फे विनोदी आविष्कार अशी सगळी सत्रे रोज तीन आणि शेवटच्या दिवशी चार अशा प्रकारे सादर होणार आहेत. एकूण दहा निवेदकांचा यात समावेश असणार आहे. वाढत्या तणावावर अक्सीर इलाज म्हणून विनोद नेहमीच चलतीत राहिला आहे. विनोदाच्या ह्या प्रवासात त्याचे रंग रूप मांडणी ही बदलली आहे. त्यात साधक बाधक बदल ही झाले आहेत. ह्या सगळ्यात विनोदाच्या सगळ्या अंगांनी विचार शक्य न होणे हे ओघाने घडते. हा विचार, भान परत एकदा तपासून पाहायला ह्या संमेलनाची नक्कीच मदत होणार आहे. दीर्घ काळ प्रतिकुलतेशी आपण सगळ्यांनी झुंज दिल्यानंतर वर्षाच्या सुरुवातीला ह्या संमेलनाच्या निमित्ताने प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण तयार व्हायला नक्कीच मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.