ठाणे: दिव्यांग व्यक्ती जर नाउमेद न होता यशस्वी जीवन जगत असतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश व्हायचे काही कारणच नाही, असे मत दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक व मनोबल प्रकल्पाचे प्रमुख यजुवेंद्र महाजन यांनी व्यक्त केले.
यजुवेंद्र महाजन यांच्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पातील, विविध कलेत निपुण अशा आठ दिव्यांग विद्यार्थ्यांसह आनंद विश्व गुरुकुल या महाविद्यालयाला भेट दिली. मनोबल प्रकल्पात दिव्यांग मुलांना स्पर्धा परिक्षेसाठी तयार केले जाते, व्यक्तिगत विकास व त्यांच्यातील कला गुणांना वाव देऊन त्यांचा विकास केला जातो. तसेच उच्च शिक्षण दिले जाते. आपण कमजोर नाही आहोत, ही जाणीव करुन दिली जाते.
समस्या सर्वांना असतात, दिव्यांगांना फक्त शरीराची समस्या आहे. ती सुद्धा शरीराच्या एका भागाची समस्या आहे, दिव्यांगांकडे वैचारिक अपंगत्व नाही आणि जे धडधाकट आहेत त्यांच्याकडे विचारांचे अपंगत्व आहे. शरीराचे अपंगत्व चालेल पण विचारांचे अपंगत्व चालणार नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांकडून प्रगती कशी करायची हे शिकायला हवे, बुद्धी आणि हृदय असेल तर आपल्याला तर पुढे जाता येईल. आपला ॲटीट्युड कसा आहे, आपल्याकडे कोणते स्कील आहे, आपल्याकडे कोणते नाॅलेज आहे, आपली व्हील पाॅवर कशी आहे आणि किती मेहनत आपण करता, यावरच आपल्याला आयुष्यात पुढे जाता येईल, आपण उराशी बाळगलेले कोणतेही स्वप्न आपल्याला पूर्ण करता येईल.
समस्यांचे पाढे वाचू नका आणि दुखी राहू नका, कमतरता प्रत्येकात असते त्यावर मात करायला शिका, आपण जीवंत आहोत हीच मोठी गोष्ट आहे, याचा आनंद साजरा करायला शिका. सगळ्यांबरोबर मैत्री करा. स्वतःला कमी समजु नका आणि स्वतःला स्पेशलही समजु नका आणि जिथे मदतीची गरज आहे तिथे खुल्या मनाने मदत घ्यायला कचरु नका. नेहमी याचा विचार करु नका की मला कोणाकडून काय मिळेल, मी समाजाला काय देऊ शकतो याचाही विचार करा. नवीन तंत्रज्ञान, नवीन कम्युनिकेशन स्कील व नवीन कल्पना शिकणे गरजेचे आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी व्यायाम करणे, ध्यानधारणा करणे, चांगली पुस्तके वाचणे याची गरज आहे. याच गोष्टी आयुष्यात पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी मदत करतील. यामुळे दिव्यांग व्यक्ती जर नाउमेद न होता यशस्वी जीवन जगत असतील तर धडधाकट व्यक्तींनी निराश व्हायचे काही कारणच नाही, असे विचार यजुवेंद्र महाजन यांनी मांडले.