ठाणे : ठाणे व उल्हासनगर महापालिका निवडणूक रिंगणात ३४२ उमेदवार हे ४१ ते ५० या वयोगटांतील आहेत. तरुणांनी राजकारणात यावे, यासाठी सर्वत्र प्रचार आणि जनजागृती करण्यात येत असली, तरी सर्वच पक्षांनी उमेदवारी देताना पन्नाशीकडे झुकलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. ४१ ते ५० यामधील उमेदवारांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ३४.३ टक्के एवढे आहे. उल्हासनगरलाही ४१-५० या वयोगटांतील उमेदवारांची संख्या जास्त आहे.ठाण्यात २१ ते ३० वयोगटांतील उमेदवारांची संख्या १०४ आहे, तर उल्हासनगरमध्ये ही संख्या ७० आहे.दोन्ही महापालिकेत सर्व पक्षांनी नव्या चेहऱ्यांना कमीअधिक प्रमाणात संधी दिली आहे. ठाण्यात भाजपा आणि मनसेने नव्या चेहऱ्यांना अधिक संधी दिली आहे. ठाण्यात ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तब्बल ८०५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये २१ ते २४ या वयोगटातील २७, २५-३० या वयोगटातील ७७, ३१-४० वयोगटातील २१६, ४१-५० वयोगटातील २२६, ५१ ते ६० वयोगटातील ९६, ६१ ते ७० वयोगटातील १४ आणि ७१-८० वयोगटातील उमेदवारांची संख्या ३ एवढी आहे. दुसरीकडे उल्हासनगरमध्येही ४१ ते ५० या वयोगटांतील उमेदवारांची संख्या ११६ एवढी असून त्याखालोखाल ३१ ते ४० वयोगटातील उमेदवारांची संख्या १११ एवढी आहे. २५ ते ३० वयोगटातील ५७, ५१ ते ६० वयोगटातील ५२, २१ ते ४० वयोगटातील १३, ६१ ते ७० वयोगटातील १२ आणि ७१ ते ८० वयोगटातील उमेदवारांची संख्या २ एवढी आहे. (प्रतिनिधी)
यंदा ३४२ उमेदवार चाळिशी पार
By admin | Published: February 18, 2017 6:43 AM