हे पूर्ण वर्ष कोरोनाच्या दहशतीमध्ये गेले. मानवजातीच्या पुढील अस्तित्वाची शंका यावी असे संपूर्ण जगात वातावरण होते. पण आता ही नकारात्मकता दूर सारत येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करायला हवे. डिसेंबरला सुरुवात झाली की वेध लागतात ते नवीन वर्षात पाऊल टाकण्याचे. नवीन वर्षाची चाहूल लागली की, सगळ्यांनाच एक नवा उत्साह येतो आणि सगळे संकल्प तयार करण्यासाठी सज्ज होतात. मराठी चित्रपट, नाट्य, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचे नेमके काय संकल्प आहेत, त्यांचा घेतलेला हा धांडोळा !
फिटनेसकडे लक्ष देणार!वाचन, लेखन वाढवायचं आहे. कोरोनामुळे कामाची विस्कटलेली गाडी पुन्हा एकदा रुळावर आणायची आहे. माझे स्वतःचे युट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये आणखीन नवीन सुधारणा करायच्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फिटनेसकडे लक्ष द्यायचे आहे. - स्पृहा जोशी, अभिनेत्री
विनोदी नाटक लिहायचंय!मागील वर्षी कोरोनाकाळात योगा आणि प्राणायामाला सुरुवात केली, ती आता सवयीचा भाग बनली आहे. यामध्ये नवीन वर्षात खंड पडू द्यायचा नाही, हा संकल्प असणार आहे. दुसरं म्हणजे या वर्षी काही झाले, तरी एक विनोदी नाटक लिहायचं आहे. ॲक्टिंगकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. - अभिराम भडकमकर, पटकथा लेखक, अभिनेता
रसिकांना सर्वोत्तम कलाकृती देणं हाच संकल्प'चंद्रमुखी' या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे दोन शेड्युल्ड पूर्ण झाले असून, शेवटच शेड्युल्ड जानेवारीमध्ये भोर येथे सुरू होईल. हा सिनेमा नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस आणणे हा माझा संकल्प आहे. याशिवाय आणखी काही २-३ प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे. - प्रसाद ओक, अभिनेता, दिग्दर्शक
वाड्यावस्त्यांवर कविसंमेलने घेणार मी गेल्या दोन महिन्यात काही कार्यक्रम केले. यातील बरेच कार्यक्रम कोकण, मुंबईत होते. कोकणातील वाड्यावस्त्यांमध्ये साहित्याची गंगाजळी अजून म्हणावी तशी पोहोचली नाही. या ठिकाणी मराठी साहित्य, सांस्कृतिक परंपरेचा इतिहास पोहोचवायला हवा. परतीच्या प्रवासात मनाशी पक्के केले की वाड्यावस्त्यांमध्ये मोठ्या संख्येने कार्यक्रम घ्यायचे. - अशोक नायगांवकर, सुप्रसिद्ध कवी
नवीन चित्रपट तयारलेखक, दिग्दर्शक म्हणून 'वेडिंग्जचा सिनेमा' हा चित्रपट लॉकडाऊनच्या काळात मोठ्या संख्येने पाहिला गेला. 'एकदा काय झालं' हा चित्रपट तयार आहे. नवीन वर्षात योग्य वेळी तो प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा माझा संकल्प आहे. - सलील कुलकर्णी, गायक, दिग्दर्शक
वेबसीरिजवर काम सुरूआता फक्त काम करायचे आहे. ‘दगडी चाळ-२’ या मराठी चित्रपटावर आणि ‘समांतर-२’, ‘एक थी बेगम’ या वेबसीरिजवर काम सुरू आहे. या तीनही गोष्टी नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येतील. २०२० हे वर्ष नैराश्यतेच्या गर्तेत गेले. हे वर्ष लवकर संपावे, असे सर्वांनाच वाटत आहे. - अमित राज, संगीत दिग्दर्शक
आरोग्यदायी जीवन महत्त्वाचेखरे सांगायचे तर मी कुठलाच संकल्प करत नाही. कोरोनाने आपल्याला स्वच्छतेचे, सामाजिक जबाबदारीचे भान कसे ठेवायचे ते शिकविले. तेव्हा आरोग्यदायी जीवनाचा संकल्प करणे महत्त्वाचे आहे. - बेला शेंडे, गायिका