- स्नेहा पावसकरठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेकांनी गणेशोत्सव साजरा केला नाही किंवा अतिशय साध्या पद्धतीने केला. अर्थातच याचा परिणाम निर्माल्य संकलनावरही झाला. आतापर्यंत सात दिवसांचे गणपती विसर्जन झालेले असून ठाण्यात केवळ १३ ते १४ टन निर्माल्य गोळा झाले आहे. दरवर्षीच्या निर्माल्य संकलनाच्या तुलनेत ही संख्या अतिशय कमी असून यंदा ५० टक्के घट झाली आहे. त्याचबरोबर यंदा थर्माकोलचा वापर १०० टक्के न करता पर्यावरणप्रेमी अशी ओळख असलेल्या ठाणेकरांनी सामाजिक भान जपले आहे.ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने निर्माल्य संकलन आणि व्यवस्थापन हा उपक्रम ठाण्यात राबवला जातो. यंदाचे या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश ठेवले जातात. स्वयंसेवक ते निर्माल्य स्वीकारतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही निर्माल्य कलश ठिकठिकाणी ठेवण्यात आले होते. तसेच काहींनी गणपती घरीच विसर्जन केले असले तरी निर्माल्य मात्र जमा केले. कोरोनामुळे साधेपणाने साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाचा परिणाम निर्माल्य संकलनावरही पाहायला मिळाला. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनादरम्यान सुमारे तीन टन, पाच दिवसांचे गणपती विसर्जनादरम्यान साधारण साडेचार टन तर सात दिवसाच्या विसर्जनादरम्यान सहा टन निर्माल्य जमा झाले आहे. एकूण १३ ते १४ टन निर्माल्य जमा झाले आहे.दरवर्षी सात दिवसात सुमारे ३० टन निर्माल्य जमा होते, मात्र यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाल्याने सजावट, आरास, हार-फुले यावरचा खर्च बहुतांश टाळला गेला आहे. परिणामी निर्माल्यात ५० टक्के घट झाली.विशेष म्हणजे यंदाच्या निर्माल्यात थर्माकोल अजिबात आढळले नाही. थर्माकोलचा वापर ठाणेकरांनी केलेला नाही, असेच दिसते. प्लास्टिकचा वापरही ८० टक्के केलेला नाही. तसेच इतर अविघटनशील पदार्थांचा वापरही करणे ठाणेकरांनी टाळलेले दिसले. सजावटीला यंदा प्राधान्यच न दिल्याने सजावटीचे साहित्यही निर्माल्यात कमी होते. हे निर्माल्य वर्गीकरण करून पुढे प्रक्रियेसाठी पाठवले आहे.- भटू सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी,समर्थ भारत व्यासपीठजनजागृतीचा होत आहे फायदा : यापूर्वी सजावटीसाठी थर्माकोलबरोबर प्लास्टिक, कार्डबोर्ड, हिरे, चमकीच्या टिकल्या यांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. गेल्या काही वर्षांत झालेल्या जनजागृतीमुळे या सर्वांचा वापर कमी होत गेला. मात्र कोरोनामुळे यंदा कुठल्याही वस्तू आढळल्या नाहीत.
यंदा निर्माल्यही झाले ५० टक्क्यांनी कमी, ठाणेकरांचे सामाजिक भान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 2:05 AM