भिवंडी: महापालिका क्षेत्रात दोन वर्षे अभय योजनेतंर्गत मालमत्ता करावर व्याज माफी देण्यात आली होती. तरीही थकबाकीदार त्यांच्या कराची रक्कम भरत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी कडक धोरण घेत यावर्षी अभय योजना लागू होणार नाही,असे जाहीर केले.महापालिकेकडून व्याजमाफी मिळेल या अपेक्षेने नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करतात. ही बाब प्रशासनातील वसुली विभागाने आयुक्त हिरे यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच व्याजमाफीमुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होते. त्याचप्रमाणे पालिकेकडून जाहीर होणाऱ्या अशा व्याजमाफीमुळे प्रामाणिकपणे कर भरणाºया नागरिकांवर अन्याय होतो. यावर्षी मालमत्ताकराच्या व्याजमाफी पोटी कोणतीही अभय योजना लागू करण्यात येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे व्याजमाफी मिळणार नाही असे हिरे यांनी प्रभाग अधिकाºयांच्या बैठकीत स्पष्ट केले. तसेच मालमत्ताधारक त्यांच्या थकीत कराची रक्कम भरत नसतील अशा थकीत मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई करा, पाणी, वीजपुरवठा खंडित करा आणि थकबाकीदारांवर कारवाई करा असे आदेश दिले. यामुळे वसुली विभागातील अधिकारी व कर्मचारी मालमत्ता कर वसुलीसाठी कार्यालयाबाहेर पडले आहेत. दरम्यान, जे अधिकारी, कर्मचारी वसुलीच्या कामात हलगर्जीपणा करतील त्या कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई म्हणून ४० टक्के पगार कपात करण्याचे आदेशही हिरे यांनी दिले आहेत.वास्तविक गेल्यावर्षापासून मालमत्ता कराबरोबर प्रत्येक मालमत्तेला १५०० रूपये जलकर लागू केला आहे. त्यामुळे एकाच इमारतीसाठी लागणारी पाणीपट्टी आता प्रत्येक फ्लॅटधारकास भरावी लागत आहे. इमारतीतील फ्लॅटधारकाच्या घरांत सोसायटीच्या नळातून पाणीपुरवठा होतो. पालिकेचा थेट पाणीपुरवठा करणारा नळ नसताना हा जलकर जबरदस्तीने लावल्याची भावना करदात्यांमध्ये पसरलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक झोपडपट्टीतही थेट पालिकेचा नळ नसताना त्यांनाही जलकर लागू केल्याने असंतोष पसरलेला आहे.नागरिकांमध्येच उदासीनताकहर म्हणजे प्रशासनाने जलकराबरोबर मालमत्ताकर भरण्याची सक्ती केल्याने मागील वर्षापासून शहरातील नागरिकांमध्ये मालमत्ता कर भरण्यासाठी उदासीनता पसरली आहे. या बाबत नगरसेवकही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत.
यंदा अभय योजना नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:39 AM