लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दरवर्षी भाद्रपद महिन्यात घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ठाण्यातील काही भाविकांनी यंदा माघी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यंदा घरगुती माघी गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढल्याने मूर्तीनाही ३० टक्क्यांनी मागणी वाढल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. त्याचप्रमाणे दरवर्षी पाच, सात, दहा दिवसांवर माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोरोनामुळे दीड दिवसांचा साजरा करणार आहे.
उद्यापासून माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. परंतु, कोरोनामुळे भाद्रपदमधील गणेशोत्सवास असणाऱ्या अटी व नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे यंदाचा माघी गणेशोत्सव हा सर्वत्र साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक मंडळांनी घेतला आहे. आमच्याकडे सार्वजनिकपेक्षा घरगुती गणेशोत्सवासाठी मूर्ती घेऊन गेले आहेत. घरगुती गणेशोत्सवासाठी अडीच फुटांपर्यंत मूर्ती बनविण्यात आल्याचे मूर्तिकार प्रसाद वडके यांनी सांगितले.
उंचीचे बंधन असल्याने यंदा चार फुटांपर्यंतच मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. मूर्तींचे दर वाढविले नसल्याचे मूर्तिकार अरुण बोरिटकर यांनी सांगितले. तसेच सार्वजनिकपेक्षा घरगुती गणेशोत्सवासाठी मूर्तींची नोंदणी झाल्याचे ते म्हणाले. दरवर्षी सार्वजनिक माघी गणेशोत्सवात भजन, कीर्तन, हळदी- कुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबीर, बालकलाकारांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यंदा कोरोनामुळे या कार्यक्रमांना ब्रेक लागला आहे. यावेळेस मंडळांनी दर्शन आणि प्रसादाचे आयोजन केले आहे.
---------------
नौपाडा सार्वजनिक माघी गणेशोत्सवाचे यंदाचे हे ९० वे वर्षे असून दरवर्षी सात दिवसांचा हा उत्सव साजरा करण्यात येतो. तसेच विविध उपक्रमही आयोजित केले जातात. यंदा हा माघी गणेशोत्सव दीड दिवसांचा तसेच अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार असून दर्शनासाठी भाविकांनी येऊ नये, असे आवाहन केले आहे.
- अच्युत दामले, नौपाडा सार्वजनिक माघी गणेशोत्सव
यंदा आम्ही मिरवणूक, भजन रद्द केले आहे. मास्क नाही त्याला प्रवेश नाही, असा बॅनर आम्ही लावणार आहोत. खबरदारीचा सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत.
- गौरव चव्हाण, राबोडी कोळीवाडा माघी गणेशोत्सव
रस्त्यावर यंदा मंडप न घालता प्रतिष्ठानच्या कार्यालयात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. दरवर्षी होणारे विविध कार्यक्रम आम्ही रद्द केले आहेत. दरवर्षी सात दिवसांचा असलेला हा माघी गणेशोत्सव दीड दिवसांवर साजरा करणार असून मूर्तीची उंचीही पाच फुटांवरून सव्वादोन फुटांवर केली आहे.
- संतोष उबाळे, जनसेवा प्रतिष्ठान, माघी गणेशोत्सव
------------
माघी गणेशोत्सवासाठी यंदा उकडीचे आंबा मोदक
उकडीच्या मोदकांना दरवर्षीपेक्षा यंदा घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांची मागणी वाढली आहे. मोदकांचा दर वाढविण्यात आले नसून उकडीच्या मोडकांमध्ये उकडीचा आंबा मोदक हा प्रकार पाहायला मिळत आहे. उकडीचा छोटा मोदक २१ रु प्रतिनग, मोठा मोदक २८ रु. प्रतिनग तर उकडीचा आंबा मोदक ३० रु. प्रतिनग असल्याचे प्रविणा नाईक यांनी सांगितले. आठ दिवस आधी भाविकांनी उकडीच्या मोदकांचे बुकिंग केल्याचे नाईक म्हणाल्या.
------------------
कोरोनामुळे पारंपरिक पेढे, मोदकांवर भाविकांचा भर आहे.
- निलेश कार्ले, दुकान मालक
मिठाईवर कोरोनाचा परिणाम नाही. उद्या सकाळी भाविक खरेदीसाठी येतील. कोरोनामुळे मिठाई मर्यादित प्रमाणात बनविली आहे.
- नितीन भोईर, दुकानमालक
--------
उकडीचे मोदक फोटो मेलवर